महाराष्ट्राच्या लावणीचा ठसकेबाज आवाज सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांनी आज (10 डिसेंबर) अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. मागील काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. आज अखेर त्यांनी मुंबई मधील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 च्या सुमारास गिरगाव मधील फणसवाडी येथील त्यांच्या घरी निधन झाले आहे. सुलोचना चव्हाण यांना 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते यंदाच त्यांनी तो दिल्लीत स्वतः स्वीकारला होता. यावेळी त्या व्हिलचेअर वरून पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहचल्या होत्या.
सुलोचना चव्हाण यांचा आवाज अनेक ठसकेबाज लावण्यांमधून रसिकांच्या भेटीला आला होता. मागील 60 वर्ष त्यांच्या आवाजाची जादू रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे.'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना'.. या आणि अशा अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. 'रंगल्या रात्री' सिनेमासाठी त्यांनी पहिली लावणी गायली होती. जयश्री गडकरी यांच्यासाठी अनेक लावण्यांसाठी पार्श्वगायन केले आहे. मराठीतील अनेक तमाशाप्रधान सिनेमांमध्ये पार्श्वगायन केले आहे. सिनेमांसोबतच त्यांनी स्वतःच्या लाईव्ह कार्यक्रमांमधूनही लावण्या गायल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: ..आणि सुलोचना चव्हाण यांना अवघा महाराष्ट्र 'लावणीसम्राज्ञी' म्हणू लागला .
पहा ट्वीट
लावणी सम्राज्ञी म्हणून परिचित असलेल्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन.@DDNewsHindi @DDNewslive pic.twitter.com/borCXongFY
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 10, 2022
प्रतिभासंपन्न कलाकार सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर पुन्हा शोककळा पसरली आहे. लावणी सारखा बाज ग्रामीण महाराष्ट्रापासून ते अगदी देशा-परदेशामध्ये पोहचवण्यामध्ये सुलोचना बाईंचा मोलाचा वाटा आहे.