Ranu Mondal ला झाली आहे 'ग' ची बाधा; चाहतीने हात लावल्यावर तिच्यावरच डाफरली
Ranu Mondal | (Instagram)

कोणाचं नशीब कधी फळफळेल सांगता येत नाही. काही जण आयुष्यभर मेहनत करतात, खस्ता खातात तरीही त्यांना हवी तशी संधी मिळत नाही. तर काही जणांना अथक परिश्रमानंतर अखेर यशाची चव चाखायला मिळतेच. राणू मोंडलची (Ranu Mondal)  गोष्टही काहीशी अशीच. रस्त्यावरती भीक मागून आपला चरितार्थ चालवणाऱ्या राणूचा 'एक प्यार का नगमा है' चा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राणू एका रात्रीत स्टार बनली. सगळीकडे तिचीच चर्चा होऊ लागली. काही सवंग टीका करणाऱ्यांनी तर तिच्या आवाजाची थेट लता मंगेशकरांच्या आवाजाशी तुलना केली. ती एक सेलिब्रिटी बनली. पण आता नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मुळे या सर्व गोष्टींनी राणूला 'ग' ची बाधा झाल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात तिच्या डोक्यात हवा गेल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (हेही वाचा. रानू मंडल यांनी गायलं शाहरुख खान चं गाणं; पहा हा Viral Video)

या व्हिडिओमध्ये राणू कुठल्या तरी दुकानात काहीतरी घेण्यासाठी रांगेत उभी आहे. एक चाहती येते आणि तिला एका सेल्फी साठी आग्रह करते. असे करताना तिचा हात चुकून राणूला लागतो. हे राणूला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती रागात 'डोन्ट टच मी, आय ऍम अ सेलिब्रिटी नाऊ' असे डाफरताना दिसते आहे. त्यावर ती चाहती काहीही न बोलता फक्त हसते. राणूची हीच वर्तणूक नेटकऱ्यांना आवडलेली नाही. अनेक जणांनी या कृतीबद्दल राग व्यक्त केला आहे.

 

राणूच्या आयुष्यातील हा बदल घडवण्याची सुरवात सलमान खान याने केली होती. त्याने तिला एक महागडं घर देखील घेऊन दिले होते. तर हिमेश रेशमिया तिच्या आवाजावर इतका फिदा झाला होता की त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील तीन गाणी देखील तिच्याकडून गाऊन घेतली होती. इतकेच नव्हे तर तिची कहाणी उलगडणारा एक चरित्रपट देखील येत असल्याची चर्चा होती. आता या सर्व गोष्टींकडे प्रेक्षक कसे बघतात हे महत्वाचं आहे.