Phoolan Devi (Photo Credits: Twitter)

दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांचा चित्रपट ‘बँडिट क्वीन’ (Bandit Queen) चा, 1994 साली कान्स चित्रपट महोत्सवामध्ये प्रीमियर पार पडला होता. यानंतर या चित्रपटाची चर्चा जगभर होत होती. आता या घटनेच्या तब्बल 25 वर्षांनंतर फूलन देवीची (Phoolan Devi) ऐतिहासिक कथा वेब सीरीजद्वारे पुन्हा एकदा जगासमोर येण्यास सज्ज आहे. निर्माते बॉबी बेदी चंबळची डाकू आणि त्यानंतर खासदार बनलेल्या फूलन देवीच्या जीवनावर 20 एपिसोडची वेब सीरीज बनवण्याची तयारी करत आहेत.

‘फूलन देवी’ असे शीर्षक असलेल्या या सीरीजचे दिग्दर्शन तिग्मन्शु धूलिया (Tigmanshu Dhulia)  करणार आहेत. अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी (Tannishtha Chatterjee) ही मुख्य भूमिकेत असणार आहे. धूलिया हे ‘बँडिट क्वीन’ चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शकही होते. बँडिट क्वीनमध्ये सीमा विश्वास यांनी मुख्य भूमिका साकारली होती. विश्वास यांच्याप्रमाणेच तनिष्ठाही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) ची विद्यार्थी आहे. चित्रपट आणि वेबसीरीज मध्ये कोणतेही साम्य असणार नाही असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: सचिन कुंडलकर करणार Netflix च्या सिनेमासाठी दिग्दर्शन, 'कोबाल्ट ब्लू' या मराठमोळ्या कादंबरीवर सिनेमाची घोषणा)

येत्या काही महिन्यांत या वेब सीरीजचे काम सुरु होईल असे बेदी यांनी सांगितले. या सीरीजचे दोन सीझन येणार असून, प्रत्येक सीझनमध्ये 10 एपिसोड असतील. पहिल्या सीझनमध्ये फूलन देवीची कैदेतील आठ वर्षे दाखवली जातील, तर दुसऱ्या सीझनमध्ये त्यांचे सुटकेनंतरचे आयुष्य दर्शवण्यात येईल. हा चित्रपट फूलन देवी यांच्या आत्मचरित्रावर आधारित असणार आहे.