पु. ल. देशपांडे जयंती विशेष: खळखळून हसवणारी पुलंची 5 सर्वोत्तम वाक्य
P. L. Deshpande | (File Image)

महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुलं देशपांडे यांची आज जयंती. त्यांच्या अनेक कलाकृतींनी महाराष्ट्राला हसवून हसवून वेडं केलंय. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी काहीही करायचं बाकी ठेवलं नाही. अगदी भारतामध्ये स्टॅन्ड अपची सुरुवात कोणी केली असेल तर तीसुद्धा पुलंनी. आणि ते सुद्धा फक्त 10-10 मिनिटांचे स्किट्स नाही तर दोन दोन तासाची नाटकं सुद्धा. बटाट्याची चाळ अख्खा नाटक ते एकपात्री उभं राहून करायचे. प्रेक्षकांची हसून मुरकुंडी वळे. चला तर मग बघूया अशीच काही लिहिली, बोलली, वाचली आणि सादर केली गेलेली 5 सर्वोत्तम वाक्य:

1. चहामध्ये दूध कमी दिसल्यावर पुलंचा अंतू बर्वा म्हणतो, ''रत्नांग्रीतल्या म्हशी तूर्तास गाभण का रे झम्प्या?"

2. असा मी असामी मध्ये नाव घ्यायला सांगितल्यावर बेमट्या असे टोपण नाव असलेल्या नायकाची नायिका नाव घेते, ''दादरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता, बेमट्याचं नाव घेते माझा नंबर पह्यला.''

3. नाथा कामत म्हणजे दर वेळी खऱ्या प्रेमात पडणारा आणि खऱ्या प्रेमात 'पडणारा' असा स्वयंघोषित प्रेमवीर. तो एके ठिकाणी त्याच्या शांत गोळे या त्याच्या एकेकाळच्या 'प्रेमा'बद्दल सांगताना म्हणतो, ''शांता गोळे म्हणजे चमनमध्ये बहार आल्यावर गुल-ए-नर्गिस वर शब-ए-रात संपल्यानंतर पडणारं शबनम होतं रे. तुला नाही कळणार ते. बाबा रे, तुझं जग वेगळं. माझं जग वेगळं '' (हेही वाचा. पु.ल. देशपांडे जयंती विशेष: घराण्याचे जसे 'कुलदैवत' असते तसे महाराष्ट्राच्या या 'पुलदैवता'च्या 5 सर्वोत्कृष्ट साहित्य कलाकृती)

4. म्हैस आडवी आल्यानंतर सुरु झालेलया सावल्या गोंधळामध्ये जेव्हा पोलिसांची एन्ट्री होते आणि पंचनामा सुरु होतो तेव्हा एक पात्र म्हणतं, ''साहेब, ती तितं उभी हाय ना, ती माझी छोकरी आणि तिच्या हातात हाय ना, ती छोकरीची छोकरी. साहेब ती सहा महिन्याची हाय.''

5. पुलंचे राव साहेब म्हणजे गडगडाटी व्यक्तिमत्व. भाषाही तशीच. 'फिल्टर' म्हणून काही नाहीच बोलण्याआधी पण तरीही पुलं म्हणतात तसे ते देवटाक्याच्या पाण्याइतके स्वच्छ. अत्यंत शौकीन माणूस. एके ठिकाणी पुलंना गाणं लिहीत असताना ते म्हणतात, ''अहो ते जरा प्राचीला गच्ची जुळतंय का काय बघा की हो जरा.'' तर दुसरीकडे एका तब्बलजीला म्हणतात, ''तबला वाजिवतंय की मांडी खाजिवतंय.''

तुम्हीही नक्की वाचा पुलंचं साहित्य आणि जे जे ऑनलाईन उपलब्ध आहे ते नक्की बघून त्याचा आस्वाद घ्या आणि पुलंची जयंती साजरी करा.