Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

टेक कंपन्यांसाठी (Tech Companies) गेले 5-6 महिने अत्यंत वाईट ठरले आहेत. ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स (Netflix) देखील यापैकी एक आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत 72 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. कंपनीला आर्थिक आणि ग्राहकांच्या बाबतीतही तोटा सहन करावा लागत आहे. त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी नेटफ्लिक्स कंपनीतून सुमारे 150 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सचा पाहिजेल तसा प्रभाव न पडल्याचे कारण देत सुमारे 150 कर्मचारी आणि अनेक कंत्राटदारांना कामावरून काढून टाकत आहे. द व्हर्जमधील एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की कंपनीच्या फॅन-केंद्रित वेबसाइट टुडमसाठी काम करणाऱ्या किमान 26 कंत्राटदारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. Netflix ने यापूर्वी जवळपास 25 लोकांना मार्केटिंग टीममधून वगळले आहे, त्यापैकी सुमारे अनेक लोक टुडमशी संबंधित होते.

आज ज्या 26 जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, त्यांना ग्रुप ईमेलद्वारे याची माहिती देण्यात आली. मात्र, नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्या एरिका मॅसनहॉल यांचे म्हणणे आहे की, हे ईमेल कंत्राटी कंपनीने पाठवले होते. कंपनीने द वर्जला सांगितले की, ज्या लोकांना कामावरून काढून टाकले जात आहे ते बहुतेक यूएस-आधारित आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, टाळेबंदीचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित नाही, परंतु आर्थिक कारणांमुळे असे करणे भाग पडले आहे.

कंपनीचे झाले मोठे नुकसान

नेटफ्लिक्सचे गेल्या तीन महिन्यात सुमारे 2 लाख ग्राहकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दशकात पहिल्यांदाच Netflix चे सदस्य कमी झाले आहेत. पुढील तीन महिन्यात सुमारे 2 लाख ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यताही कंपनीने व्यक्त केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धामुळे अमेरिकेने रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले. युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक अमेरिकन कंपन्यांनी रशियातील व्यवसायही बंद केला. त्या कंपन्यांमध्ये नेटफ्लिक्सचाही समावेश आहे. (हे देखील वाचा: Netflix ने दिला मोठा झटका! वापरकर्ते करू शकणार नाहीत 'हे' काम; खिशावरही होणार परिणाम)

शेअर बाजारतही कंपनीला फटका

शेअर बाजारातील या सर्व घटकांचा फटका कंपनीलाही बसला आहे. सहा महिन्यांपूर्वी, त्याच्या शेअरची किंमत $ 682 पेक्षा जास्त होती. ते आता 72.06 टक्क्यांनी घसरून फक्त $190.56 वर आले आहे. गेल्या एका महिन्यात त्याचा स्टॉक 43 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Netflix चा स्टॉक सर्वकालीन उच्चांकावर होता. त्यावेळी नेटफ्लिक्सच्या शेअरची किंमत $700 च्या जवळपास पोहोचली होती.