मुंबईच्या डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका; America Got Talent मध्ये सादर केलेल्या परफॉर्मन्समुळे जजेस कडून Standing Ovation
V Unbeatable Group (Photot Credit : Facebook)

नुकतेच मुंबईच्या द किंग (The King) या हिप हॉप ग्रुपने अमेरिकेमधील वर्ल्ड ऑफ डान्स (World of Dance) हा रिअ‍ॅलिटी शो जिंकला. ही घटना ताजी असताना, अजून एक मुंबईचाच ग्रुप आपल्या कलेचा डंका अमेरिकेत वाजवताना दिसत आहे. लोकप्रिय शो अमेरिका गॉट टॅलेंट (America Got Talent) पुन्हा एकदा दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी 28 मेपासून सुरु होत आहे. मंगळवारी होणाऱ्या या शोच्या प्रीमियर पूर्वी, निर्मात्यांनी सोशल मिडीयावर मुंबई डान्स ग्रुप व्हि अनबीटेबल (V Unbeatable) च्या डान्स परफॉर्मन्सची एक झलक पेश केली आहे.

या व्हिडिओमध्ये मुलांचा अफलातून डान्स पाहून शोचे जजही आश्चर्यचकित होऊन उभे राहतात आणि या ग्रुपसाठी टाळी वाजवताना दिसतात. व्हिडिओ शेअर करताना मेकर्सनी या ग्रुपची स्तुती केली आहे. व्हि अनबीटेबल ग्रुपने ही जबरदस्त कामगिरी करण्यापूर्वी गणपती बाप्पा मोरयाचा जयजयरकार केला. त्यानंतर या ग्रुपने 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या 'मल्हारी' या गाण्यावर नृत्य केले. त्यांच्या या परफॉर्मन्सला स्टॅडिंग ओव्हेएशन मिळाले आहे. (हेही वाचा: 'The King' या मुंबईकर हिप हॉप डान्स ग्रुपने जिंकला अमेरिकन 'World of Dance'हा रिअ‍ॅलिटी शो)

या डान्समध्ये या मुलांनी जो तालमेल साधला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. सोबत या नृत्यामध्ये असे काही धोकादायक स्टंट सादर केले जे पाहून दर्शक आणि जज यांची स्थिती अगदी तोंडात बोटे घालण्यासारखी झाली होती. या ग्रुपमध्ये 12 ते 27 वयोगटातील सदस्य आहेत.