
मराठी सिनेसृष्टीमधील 'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीच्या पुण्यामधील निगडी तील घरात एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. काल (24 मे)दिवशीची ही घटना घटना असून झालेल्या झटापटीमध्ये सोनालीच्या वडिलांना दुखापत झाली मात्र ते आणि कुलकर्णी कुटुंब सुखरूप आहेत. पण या अनपेक्षित घटनेमुळे मात्र सार्यांनाच धक्का बसला आहे. सोनाली सध्या पुण्यात नसून दुबई मध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाली कुणाल बेनोडेकर सोबत विवाह बंधनात अडकली आहे.
दरम्यान मुंबई तक सोबत सोनालीची फोन वरून बातचीत झाली आहे. यावेळेस सोनालीने या घटनेला दुजोरा दिला आहे. '24 मेच्या रात्री अज्ञात व्यक्ती घरात घुसली आणि तिने वडिलांवर चाकूने हल्ला केला. या चाकूहल्ल्यांत वडिलांच्या हाताला दोन जखमा झाल्या. पण ते ठीक आहेत. निगडी पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आरोपीला अटक केली आणि कुटुंबालाही मदत केल्याची माहिती दिली आहे.
सोनाली कुलकर्णीच्या घरात प्रवेश करणार्या व्यक्तीकडे चाकू आणि मिरची पूड सापडली आहे. अद्याप तो चोरीच्या प्रयत्नामध्ये घुसला होता की सोनालीचा चाहता होता याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस त्याचा पुढील तपास करत आहेत.
18 मे दिवशी सोनालीने 33 व्या बर्थ डे चा मुहूर्त साधत दुबईत कुणाल सोबत लगीनगाठ बांधली आहे. तिने लग्नाच्या खर्चाला कात्री लावत ते पैसे कोविड संकटात वापरण्याचे ठरवले आहे.