मराठी चित्रपटसृष्टी ही गेल्या काही वर्षांमध्ये कात टाकत आहे. इथे नवनवीन प्रयोग घडत आहेत, नवीन कथा, नव्या पद्धतीचे दिग्दर्शन, पटकथा यांमुळे मराठी चित्रपटांनी अटकेपार झेंडे लावले आहेत. मराठीमधील कलाकारही आता राष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. अभिनयासोबतच फॅशनच्या बाबतीतही अनेक मराठी कलाकारांकडे आयकॉन म्हणून पहिले जाते. मात्र अजूनही अशा मराठी कलाकारांची तुलना इतर सुपरस्टार्सशी केली जाते. मराठीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे इथे आले, या मातीत कष्ट केले व मोठे झाले. तर आज आपण मराठी चित्रपट सृष्टीमधील असे कलाकार पाहणार आहोत, ज्यांच्यापुढे इतर सुपरस्टारही फिके पडतील.
सुबोध भावे (Subodh Bhave) – या यादीमध्ये सर्वात पहिले नाव सामील होते सुबोध भावे याचे. सुबोधने गेल्या काही वर्षांमध्ये बालगंधर्व, लोकमान्य एक युगपुरुष, कट्यार काळजात घुसली, डॉ काशिनाथ घाणेकर असे अनेक सुपरहिट दिले आहेत. त्याशिवाय सुबोध मालिकांच्या मार्फतही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. इतकेच नाही तर, रंगभूमीवरही सुबोधने आपली खास अशी ओळख निर्माण केली आहे. 2019 मध्ये सुबोधचे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक अतिशय गाजले होते.
स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) – रामायण या मालिकेमधून स्वप्नील जोशीने छोट्या पडद्यामार्फत इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्वप्नीलने हिंदीमध्ये थोडेफार काम केले, मात्र त्यानंतर त्याची पावले मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली व आता जवळजवळ 20 वर्षे स्वप्नील मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनेक मालिका, नाटके, चित्रपट यांद्वारे आज स्वप्नील जोशीचे नाव सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी कलाकारांमध्ये घेतले जाते. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाने स्वप्नीलला एक खास ओळख निर्माण करून दिली.
अंकुश चौधरी (Ankush Choudhari) - मराठीमधील एक ‘गुड लुकिंग’ चेहरा म्हणून अंकुश चौधरीकडे पहिले जाते. अंकुश हा मराठीमधील असा कलाकार आहे ज्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत. कॉमेडी असो वा भावनिक, सिरीयस असो किंवा रावडी, अंकुशने अनेक विविधांगी भूमिकांना उत्तमरित्या न्याय दिला आहे. ‘दुनियादारी; व ‘डबल सीट’ हे तर अंकुशच्या करियरमधील मैलाचे दगड म्हणावे लागतील.
अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) – मराठीमध्ये संवेदनशील भूमिका साकारणारा कलाकार म्हणून अतुल कुलकर्णीकडे पाहिले जाते. अतुल कुलकर्णीने फक्त मराठीच नाही तर हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, इंग्लिश, मल्याळम, बंगाली, ओडिया अशा कैक भाषांमध्ये काम केले आहे. मराठीमधील कदाचित असा एकमेव कलाकार असे ज्याने इतक्या सर्व भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘नटरंग’ने अतुल कुलकर्णीला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. सध्या अतुल, डीजीटल माध्यमावरही आपली छाप पाडत आहे.
प्रशांत दामले (Prashant Damle) – मराठी रंगभूमीवरील एक लोकप्रिय नाव म्हणजे प्रशांत दामले. टूरटूर, लग्नाची बेडी, गेला माधव कुणीकडे, लेकुरे उदंड झाली, व्यक्ती आणि वल्ली, एका लग्नाची गोष्ट, बहुरूपी अशा अनेक नाटकांद्वारे प्रशांत दामलेने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. नाटकांच्या प्रयोगांच्या बाबतीतही प्रशांतने एक स्वतःचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. नाटकांच्या सोबतही चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रशांत दामलेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विनोदाच्या टायमिंग बाबतीत तर प्रशांत हात धरणे फार कमी कलाकार आहेत. (हेही वाचा: विनोदीवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे धनंजय माने इथेच राहतात का ते भुसनाळ्यापर्यंत हिट कॉमेडी सीन्स, Watch Videos)
याशिवाय, नाना पाटेकर, मोहन जोशी, सिद्धार्थ जाधव, महेश जाधव, प्रसाद ओक, सुमित राघवन, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या समोर कोणत्याही चित्रपटसृष्टीमधील कलाकार फिके पडतील.