फक्त 'ठाकरे'च! 25 जानेवारीला दुसरा कुठलाच सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही - शिवसेना नेता
ठाकरे चित्रपट (Photo credit : youtube)

Thackeray Movie Release: बहुचर्चीत ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली. अवघ्या काही मिनिटांचा असलेला हा अनेकांना आवडला. त्यामुळे ट्रेलर असा तर चित्रपट कसा याबाबत उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. दरम्यान, येत्या 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे' सिनेमाच (Thackeray Movie) प्रदर्शित होईल. दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा थेट धमकीवजा इशाराच शिवसेना चित्रपट सेनेचे (Shiv Sena Chitrapat Sena) सरचिटणीस बाळा लोकरे (Bala Lokare) यंनी दिला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बाळा लोकरे यांच्या नावाची सोशल मीडियावरील एक पोस्ट सोशल मीडियातून फिरत आहे. या पोस्टमध्ये 'ठाकरे चित्रपट येत्या 25 तारखेला प्रदर्शित होतो आहे. दुसरी कोणताही चित्रपट आम्ही या दिवशी प्रदर्शित होऊ देणार नाही', असे म्हटले आहे. दरम्यान, हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता आणि तमाम शिवसैनिकांचीही तिच इच्छा आहे. त्यामुळे त्या दिवशी आम्ही इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा लोकरे यांनी दिला आहे. (हेही वाचा, 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; बाळासाहेबांची जीवनगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर (Video)

शिवसेना नेता सोशल मीडिया संदेश (Image courtesy: Social media and media)

दरम्यान, येत्या 25 जानेवारीला 'मणकर्णिका' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे आणि राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका कंगणा रनौट साकारत आहे. तसेच, इम्रान हाश्मी याची मुख्य भूमिका असलेला 'चीट इंडिया' हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर, याच दिवशी 'ठाकरे' हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्व चित्रपट एकाच दिवशी प्ररर्शित होणार की, शिवसेना चित्रपट सेनेच्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड चित्रपट माघार घेणार याबाबत उत्सुकता आहे.