देशाने आजवर कधीही न अनुभवलेला असा लॉकडाऊनचा अनुभव कोरोनामुळे अनुभवायला लागला. यात शुभकार्यांमध्ये अनेक अडथळे आले. मात्र ते पार करत अनेक लग्न समारंभ, साखरपुडे झालेही.. हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) यांची प्रमुख भूमिका असलेला 'लॉकडाउन लग्न' (Lockdown Lagna) या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत नवीन प्रोजेक्टला सुरुवात असे म्हटले आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून पोस्टरमध्ये मास्क हा अंतरपाट म्हणून धरण्यात आला आहे. आणि त्यावर आमंत्रण पत्रिकाही छापली आहे. तर ओवाळणीच्या ताटासोबत सॅनिटायझर, ऑक्सिमिटर ठेवण्यात आले आहे. लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळेच एकूणच नेमकं या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरूप काय असणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत.हेदेखील वाचा- Aastad Kale Birthday: बिग बॉस मराठी 1 चा स्पर्धक आस्ताद काळे विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
View this post on Instagram
निर्माता किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक सह निर्माता हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर आणि सहनिर्माते म्हणून निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांचाही या चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात वाटा आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिच्यासह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
लॉकडाउन मधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला आहे. ‘लॉकडाउन लग्न’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला रसिक-मायबाप हजेरी लावून तितकेच प्रेम देतील अशी आशा आहे.