Me Pan Sachin Trailer: भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा दैवत मानला जातो. सचिनला आदर्श मानून गल्लीगल्लीमध्ये अनेक तरूण क्रिकेट खेळतात. पण फारच मोजक्या तरूणांना क्रिकेट हेच आपलं करियर बनवता येतं. 'मी पण सचिन..' (Me Pan Sachin) या सिनेमामध्येही अशाच एका ध्येयवेड्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच 'मी पण सचिन..' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडीयामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पहा 'मी पण सचिन..' सिनेमाचा टीझर
'मी पण सचिन..' ट्रेलर
'मी पण सचिन..' या सिनेमाची सुरूवात 'सचिन..सचिन..' या जयघोषामध्ये होते. त्यानंतर स्वप्नील जोशीची एन्ट्री होते. अनेकदा ग्लॅमरस अंदाजात स्वप्नील जोशीला पाहिलं असेल पण या सिनेमात एका ग्रामीण भागातील तरूणाची भूमिका स्वप्नील जोशी साकारत आहे. क्रिकेटवेड्या या तरूणाला भारतासाठी क्रिकेट जगतातील आयकॉनिक 'लॉर्ड्स'च्या मैदानावर खेळायचं असतं. पण घर, संसारयांच्या रहाटगड्यात अडकलेल्या स्वप्नीलचं स्वप्न हळूहळू मागे पडतं. पण अनेकदा त्याचं हे स्वप्न पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येतं. स्वप्नील जोशीसोबत प्रियदर्शन जाधव त्याच्या मित्राची भूमिका साकारत आहे. तो त्याला पुन्हा खेळायला प्रवृत्त करतो. भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न पूर्ण होतं का? त्याचा हा रंजक प्रवास आहे. केवळ क्रिकेटवेड्यांसाठी नव्हे तर तुमचं पॅशन जपण्याची इच्छा असणार्या अनेकांना यामधून खास संदेश देण्यात आला आहे.
'मी पण सचिन..' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा श्रेयस जाधव याच्याकडे आहे. श्रेयस जाधव हा मराठी रॅपर म्हणून लोकांसमोर आला आहे. मात्र या सिनेमातून पहिल्यांदा तो दिग्दर्शन क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी, प्रियदर्शन जाधव, अनुजा गोखले, अविनाश नारकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा 1 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्रभर रीलिज होणार आहे.