Mi Pan Sachin Teaser : सचिनसारखे बनण्याचे ध्येय बाळगणाऱ्या ध्येयवेड्या तरुणाची कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मी पण सचिन (Photo credit : youtube)

Mi Pan Sachin Teaser : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सारखे बनण्याचे ध्येय बाळगणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाची कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मी पण सचिन’ (Mi Pan Sachin) असे या चित्रपटाचे नाव असून, नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भविष्यात सचिन होऊ पाहणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूवर हा चित्रपट आधारीत आहे. विशेष म्हणजे,  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव याने केले आहे.

सचिनच्या नावाचा जयघोष आणि तो देव असल्याच्या संवादाने टीजरची सुरुवात होते. थोड्याच वेळात स्टेडियमवर अवतरतो सचिन होऊ पाहणारा स्वप्नील जोशी. क्रिकेटच्या अवतारातील स्वप्नील जोशीचा लूक फारच हटके आहे. त्यात खेळाच्या मैदानावर चित्रित झालेले शॉट्स हे अगदी जागतीक दर्जाचे वाटतात, ज्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण होते. तसेच यातून हा चित्रपट फक्त क्रिकेटवर आधारित नसून आयुष्यावरही तितकाच आधारित आहे हेही लक्षात येते.

गेल्या काही वर्षांपासून, खेळ ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन अनेक चित्रपट तयार झाले आहेत. यात खेळाडूंचे बायोपिकला ही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यातल्या त्यात क्रिकेट हा तर जनतेचा प्राण आणि सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव मानला जातो. सचिनच्या आत्मचरित्रावर डॉक्यूमेंटरीवजा चित्रपट आला होता. मात्र मराठीमध्ये सचिनसंदर्भात तसे काही निर्माण झाले नव्हते. आता ‘मी पण सचिन’ हा चित्रपट स्वप्नील आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी ट्रिट ठरणार आहे यात काही शंका नाही.

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट जागतिक स्तरावर वितरीत केला जाणार आहे.