मराठी ज्येष्ठ संगीतकाराचा आयटम साँग करण्यास नकार; 'गाणे झाल्यावर गोमुत्र शिंपडून घ्या', दिग्दर्शकाने दिला सल्ला
बकाल (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्याची चित्रपटांची एकूण बांधणी पाहता आयटम साँग (Item Song) ही प्रत्येक सिनेमाची गरज बनली आहे. अनेक ठिकाणी कथेची गजर नसतानाही निर्माते आयटम साँगचा अट्टाहास धरतात. काही संगीतकार विविध कारणांनी अशा गाण्यांना संगीत देतातही, मात्र जे हाडाचे संगीतकार असतात त्यांना अशी गाणी बनवणे थोडे अवघड जाते. असाच अनुभव जेष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांना आला. त्यावर उपाय म्हणून, ‘हे आयटम साँग झाल्यावर हवेतर गोमुत्र शिंपडून घ्या, पण हे गाणं करा’ असा सल्लाही देण्यात आला.

छायाचित्रणकार सिनेदिग्दर्शक आणि अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये (Sameer Athalye) यांचा ॲक्शनपट ‘बकाल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अशोक पत्की यांच्यावर सोपवण्यात आली होती. हा चित्रपट तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आल्याने त्याचे संगीतही तसेच उडत्या चालीचे अपेक्षित होते. पत्की साहेबांनी गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनेला काही चाली दिल्या. मात्र या चाली टीमला आवडल्या नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन संगीत संयोजकाच्या साहाय्याने पुन्हा संगीत रचना केली. परंतु या चालीही टिमला भावल्या नाहीत.

अखेर अशोक पत्कींनी चिडून आपण हा चित्रपट करीत नसल्याचे सांगितले. त्यावर समीर यांनी त्यांची समजूत काढली व कशीबशी गाणी तयार झाली, जी सर्वांना आवडली. त्यानंतर समीर यांनी अशोकजींना आयटम साँग करण्यास सांगितले. त्यावर अशोक पत्कीजींनी त्याला पूर्णतः नकार दिला. ‘मी असली गाणी कधी केली नाहीत आणि असल्या शब्दांना मी मुळीच संगीत देणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर समीर यांनी ‘हे गाणे तुम्हीच करायचे, हवे तर नंतर गोमुत्र शिंपडून घ्या!’ असा सल्ला दिला.

समीर यांच्या हट्टामुळे अशोक पत्कींनी 'छम छम....बर्फी संत्र्याची' हे आयटम साँग बनवले. माधुरी करमरकर, कविता राम, जान्हवी अरोरा आणि अमृता दहीवेलकर या चार तारकांवर हे गाणे चित्रित झाले आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.