मराठी सिनेसृष्टीला वेध लागलेल्या 'ब्लॅक लेडी' चा पुरस्कार म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2021 (Marathi Filmfare Awards 2020) रविवारी (28 फेब्रुवारी) मुंबईत दिमाखात पार पडला. यात मराठीसह अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, एकाच ठिकाणी जमले होते. ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. या फिल्मफेअर सोहळ्याचे सूत्रसंचालनाची धुरा यंदा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव या मातब्बर कलाकारांनी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सर्वांचेच चांगले मनोरंजन केले.
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाने बाजी मारली. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित प्रभाकर याला पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार दोन अभिनेत्रींना विभागून देण्यात आला. यात आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी भाग्यश्री मिलिंद हिला तर सोनाली कुलकर्णी हिला हिरकणी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आनंदी गोपाळसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला.हेदेखील वाचा- 'जंगजौहर' चित्रपटाचे नाव बदलले, येत्या 10 जूनला 'पावनखिंड' या नावाने सिनेमा होणार प्रदर्शित
येथे पाहा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांची नावे
1सर्वोत्कृष्ट बालकलाकार- आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)
2. सर्वोत्कृष्ट लिरिक्स- क्षितीज पटवर्धन (खारी बिस्किट)
3. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे (खारी बिस्किट)
4. सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)- शिवानी सुर्वे (ट्रिपल सीट)
5. सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- शुभंकर तावडे (कागर)
6. सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन)- सलील कुलकर्णी (वेडिंगचा शिनेमा)
7. सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक)- बाबा
8. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (कागर)
9. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नीना कुलकर्णी (मोगरा)
10. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शाल्मली खोलगडे (गर्लफ्रेंड)
11. सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंग (बाबा)
12. सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- सौरभ भालेराव (गर्लफ्रेंड)
13. सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन- निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (फत्तेशिकस्त)
तसेच पौर्णिमा ओक यांनी फस्तेशिकस्त चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.