
नवरात्रीत नवमीच्या रात्री दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले.
रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता 'डॅडीं'च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते.

मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द 'डॅडी' असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनीसुद्धा 'डॅडीं'चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.
'दगडी चाळ २ ' या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून शूटिंग सुरू झाले आहे. 'दगडी चाळ २' मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे.