देशभरात 15 फेब्रुवारीपासून वाहनांवर फास्टॅग (FASTag) लावणे बंधनकारक झाले आहे. फास्टॅग नसल्यास संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेली फास्टॅगच्या सुविधेने मात्र प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदिप खरे (Sandeep Khare) यांच्या नाकी नऊ आणले आहे. कोल्हापूर-पुणे या प्रवासादरम्यान टोल नाक्यावर आलेला अनुभव संदिप खरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे. हा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. 'हा फास्टॅग नाही, स्लोटॅग होतोय' असे ते या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
"आता टोलनाका म्हटलं की टेन्शन येते. इतके दिवस गर्दीचे टेन्शन होते. आता गर्दी आणि फास्टॅगचे टेन्शन आहे" अशा आशयाचे कॅप्शन लिहून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.हेदेखील वाचा- FASTag देशभरात बंधनकारक पण मुंबई मध्ये Bandra-Worli Sea Link सोबत 5 टोलनाक्यांवर मार्च महिन्यापर्यंत स्वीकरली जाणार रोख रक्कम!
View this post on Instagram
काय म्हणाले संदिप खरे?
टोलनाका आला की आता टेन्शन येतं… इतके दिवस गर्दीचं टेन्शन होतं… आता गर्दी + फास्टॅगचं टेन्शन आहे”, अशा आशायच्या कॅप्शनसह संदीप खरेंनी व्हिडिओ शेअर केला आहे. “नमस्कार, मी कोल्हापूरजवळ किणी टोलनाक्यावर होतो…तिथे फास्टॅग स्कॅन झालं नाही… टोल नाक्यावरील माणूस पॅसेंजर सीटसमोरचा फास्टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न करत होता, तो स्कॅन झाला नाही..फास्टॅगला बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो….गाडी मागे-पुढे केली की मग ते मशिन आणतात, मग ते स्कॅन करतात…नाही झालं की मग ते पैसे घेतात. पण, आज तर त्यांनी माझ्याकडे 75 + 75 म्हणजे दीडशे रुपये असा दुप्पट दंड मागितला. माझ्या कार्डमध्ये पैसे आहेत त्यामुळे मी पैसे देणार नाही अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर त्यांचा उत्तर भारतीय बॉस आला आणि तुम्हाला उभं राहायचं असेल तर उभं राहा पण पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. त्याने हुज्जत घातल्यानंतर फास्टॅग पुन्हा स्कॅन केला, यावेळी फास्टॅग स्कॅन झाला. पण या सर्व गडबडीमध्ये माझे 10 मिनीटे वाया गेले.
यावर संबंधीत प्रशासनाने काहीतरी उपाय करावा, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्या…सिस्टिम दुरूस्त करा पण कृपया काहीतरी उपाय करा” अशी विनंती खरे यांनी केली आहे.
फास्ट टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळणार आहे. आरटीओ (RTO) कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बॅंकांमध्ये फास्ट टॅग उपलब्ध करण्यात आले आहेत. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी विशेष विक्री केंद्र आहेत.