मराठी सिनेसृष्टीतून पुढे येत बॉलिवूडचा रुपेरी पडदा सुद्धा गाजवलेला अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde). अजूनही जर विनोदी अभिनेत्यांची नावे आठवायचे म्हंटले तरी या अस्सल विनोदवीराचे नाव चटकन तोंडावर येते. लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या याची आज जयंती आहे. 26 ऑक्टोबर 1954 रोजी लक्ष्मीकांत चा जन्म झाला . तर 1985 मध्ये लेक चालली सासरला (Lek Chalali Sasarla) या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत त्याने पदार्पण केले. यांनतर तर लक्ष्याने धुमधडाका (Dhumdhadaka), अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banvabanvi), थरथराट (Thartharat) , झपाटलेला (Zapatlela) यासारखे तिकीटबारीवर हिट ठरलेल्या चित्रपटांचा सपाटाच लावला होता. प्रत्येक सिनेमासाठी लक्ष्या एक हुकुमी एक्का ठरत होता तर, विनोदाचे टाईमिंग, पंच लाईन, भन्नाट गाणी या सगळ्याचा फुल्ल पॅक सिनेमा करताना प्रेक्षकांनी देखील त्याला डोक्यावर घेतले होते.
लक्ष्याच्या अभिनयासोबतच त्याचा डान्स देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरायचा. हमाल दे धम्माल मध्ये कुली बनून, तर अशी ही बनवाबनवी मध्ये चक्क साडी नेसून भन्नाट एनर्जित लक्ष्याने केलेला डान्स अजूनही सर्वांच्या लक्षात असेल. आज लक्ष्मीकांत बेर्डे च्या जयंती निमित्त अशाच काही अजरामर सिनेमातील गाण्याचा एक फ्लॅशबॅक पाहुयात..
हमाल दे धमाल
कुणीतरी येणार येणार ग, (अशी ही बनवाबनवी)
धक धक मनात झालंय सुरु
जेवायला काय करू, (कमाल माझ्या बायकोची)
मी आलो मी पहिलं
आजवर शेकडो सिनेमांमधून लक्ष्या आणि महेश (महेश कोठारे) ही हिट जोडी समोर आली होती. या दोस्तांची जोडी जेव्हा कधी मोठ्या पडद्यावर आली तेव्हा त्यांनी प्रेक्षकांना हसून हसून वेडे केले. लक्ष्याचा महेश महेश हाक मारतानाचा सूर असो वा अशी ही बनवाबनवी मधील धनंजय माने इथेच राहतात का हा अजरामर डायलॉग आजही प्रेक्षक हे सर्व क्षण आठवून अगदी खळखळून हसतात. अनेकांना आनंद देऊन निघून गेलेल्या अशा या हास्यसम्राटाला लेटेस्टली मराठीचे विनम्र अभिवादन