अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) दिग्दर्शित 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटावरून राजकीय वाद चिघळत आहे. काल ठाण्याच्या विवियाना मॉल (Viviyana Mall) मध्ये एनसीपी कार्यकर्त्यांनी राडेबाजी करत या सिनेमाचा खेळ बंद पाडला. एनसीपी कार्यकर्त्यांच्या (NCP Workers) मते ''हर हर महादेव'' चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. चूकीचा इतिहास समोर जाऊ नये यावरून आक्रमक झालेल्या एनसीपी कार्यकर्त्यांनी निषेध वर्तवला आहे. पण आज सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या वादावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
अभिजित यांच्या दाव्यानुसार, त्यांनी सारे ऐतिहासिक दस्ताऐवज यांच्यावर आधारितच सिनेमा आहे. ते संदर्भ सेन्सॉर बोर्डाकडे दिले आहेत. त्याच्या आधारेच सिनेमाला सर्टिफिकेट देण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमा न पाहता त्याच्यावर टीका करणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान या शिवभक्त समजणार्यांनी अशाप्रकारे शिवराळ भाषा वापरत, तोडफोड करत सिनेमाचा खेळ बंद करणं, रसिकांना त्रास देणं हा प्रकार म्हणजेच त्यांच्याकडूनच शिवरायांचा एकप्रकारे अपमान आहे. त्यामुळे या अपमानाची माफी केवळ शिवरायांप्रती नव्हे तर महाराष्ट्राची देखील मागावी असं सुनावत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नक्की वाचा: Har Har Mahadev Controversy: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा, प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची .
ठाणे येथील हर हर महादेवच्या शो मध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम ह्या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून शिका.
— Abhijeet Deshpande (@unbollywood) November 7, 2022
हर हर महादेव हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित आहे. बाजींनी पावनखिंड लढवून हिंदवी स्वराज्यावरील संकट एकहाती परतवलं होतं. या सिनेमामध्ये राज ठाकरेंचा व्हॉईस ओव्हर आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्तेदेखील या सिनेमाला विरोध करणार्यांविरूद्ध उभे ठाकले होते. पण राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास, समाजमाध्यमांवर टीका-टिपण्णी करण्यापासून रोखलं आहे.
आज अभिजित देशपांडे 'हर हर महादेव' सिनेमात जे दाखवलं आहे, त्यासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भाच्या बाबतीत संध्याकाळपर्यंत सविस्तर निवेदन देणार आहेत. त्यातून या सिनेमातील ज्या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्याची उत्तरं दिली जातील. पण झालेला प्रकार लांच्छनास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.