Mahesh Kothare 67th Birthday: तात्या विंचू, कवट्या महांकाळ, कुबड्या खवीस, झगड्या रामोशी या खलनायक नावांना जिवंत करणारे आणि नायकांइतकीच किंबहुना त्याहून जास्त प्रसिद्धी मिळवून देणारे मराठी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा आज 67 वा जन्मदिवस. महेश कोठारे यांचा जन्म 28 सप्टेंबर 1963 मध्ये झाला. लहानपणापासून त्यांनी आपण अभिनेता व्हायच असं मनाशी पक्कं केलं होतं. त्याला कारण म्हणजे त्यांचे आई-वडिल जेनमा कोठारे (Jenama Kothare) आणि अंबर कोठारे (Ambar Kothare) हे दोघेही कला क्षेत्राशी जुडलेले असून हे दोघे रंगभूमीचे कलाकार होते. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली असून त्यामागे तितकीच खास अशी कहाणी आहे.
गोंडस, निरागस चेहरा आणि अभिनयाची आवड या गुणांमुळे महेश कोठारे यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला. मात्र त्यामागे तितकीच खास कहाणी आहे. 'छोटा जवान' हा त्यांचा पहिला चित्रपट. ज्यात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. हा चित्रपट मिळण्यामागची कहाणी फारच गंमतीशीर आहे. महेश कोठारे यांचे वडिल अंबर कोठारे त्यांच्या 'जेथे जाऊ तिथे' हे नाटक निर्मित केले होते. त्या नाटकासंदर्भात बोलण्यासाठी अंबर कोठारे गजानन जहागिरदार यांस भेटावयास गेले. त्यावेळी महेश कोठारे यांनी वडिलांसोबत जाण्यास हट्ट करु लागले. त्यामुळे अंबर कोठारे यांना त्यांना देखील आपल्यासोबत नेले. आणि झाले असे की गो-या गोब-या चेह-याचा महेश कोठारे यांना पाहून गजानन जहागिरदार म्हणाले 'मला माझा छोटा जवान' सापडला. अशा प्रकारे त्यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला. महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारे हिचा मेकओव्हर पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, फोटो पाहून चाहत्यांनी केली हॉलिवूडच्या 'या' हॉट अभिनेत्रीशी तुलना
त्यानंतर त्यांनी हिंदीतील अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. राजा और रंक या चित्रपटातील 'तू कितनी अच्छी है' हे गाणे तुफान गाजलं ते आजही लोकांच्या स्मरणात कायम आहे. त्यानंतर त्यांनी मराठी हिंदीत अनेक चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले. तसेच 'धुमधडाका' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल टाकले. हळूहळू अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक या सर्व भूमिका त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या.
त्याचबरोबर चित्रपटांसोबत त्यांनी मराठी मालिकांमध्ये दिग्दर्शनास सुरुवात केली. 'मन उधाण वा-याचे' ही त्यांची पहिली मालिका होती. त्यानंतर जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया आणि सध्याची स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असते या त्यांच्या लोकप्रिय मालिका आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराला लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!