Email Female Poster: लॉकडाऊनमुळे रखडलेला 'ईमेल फिमेल' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा नवे पोस्टर
Email Female Poster (Photo Credits: Facebook)

गेल्या काही काळापासून सोशल मिडियाने न केवळ तरुणाईला तर ज्येष्ठ नागरिकांवर देखील आपली मोहिनी घातली आहे. यामुळे सोशल मिडिया हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय झाला. त्यात लॉकडाऊनमध्ये तर या सोशल मिडियाने तर बाजीच मारली. अगदी मित्र-मैत्रिणी बनविण्यापासून लग्नासाठी मुलं-मुली पसंत करण्याचा कार्यक्रमदेखील सोशल मिडियावर रंगू लागला. मात्र म्हणतात ना प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. याच दोन बाजू लोकांसमोर घेऊन येतोय एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'ईमेल फिमेल (Email Female)'... लॉकडाऊनमुळे रखडलेला हा चित्रपट येत्या 26 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ईमेल फिमेल या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करणारे एक नवे पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात अभिनेते निखिल रत्नपारखी (Nikhil Ratnaparkhi) आणि कांचन पगारे (Kanchan Pagare) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. निखिल रत्नपारखी यांनी या चित्रपटाचे पोस्टर आपल्या सोशल अकाउंट शेअर करत याबाबत माहिती दिली.हेदेखील वाचा- Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा 'बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाची कथा लेखन आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनिष पटेल यांनी केली आहे. करमणूकीसोबत प्रबोधन करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव व्यक्त केला आहे.

ईमेल फिमेल या चित्रपटात निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहे.