Dharmaveer: बाहुबलीच्या दिग्दर्शकाला मराठमोळ्या धर्मवीरची भुरळ !
Dharamveer (Photo Credit - Insta)

भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम प्रस्थापित केलेला चित्रपट म्हणजे बाहुबली(Bahubali) . बाहुबलीने केवळ दाक्षिणात्यच नाही तर एकूणच भारतीय चित्रपटाची परिभाषा बदलली. याचं सर्वार्थाने श्रेय जातं ते हे भव्य दिव्य स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना. बाहुबली चित्रपटाचे दोन भाग आणि सध्या केवळ देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालणारा आर.आर.आर. या चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो राजामौली यांचा ! अशा या प्रतिथयश दिग्दर्शकाला भुरळ घातलीये आपल्या मराठमोळ्या 'धर्मवीर मु.पो. ठाणे' (Dharmaveer) चित्रपटाने! आज सकाळी धर्मवीरचे दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde), निर्माते मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांची हैदराबाद येथे एस. एस. राजमौली (S.S Rajamouli) सोबत भेट झाली. यावेळी त्यांनी या चित्रपटाचा टिझर राजामौली यांना दाखवला. हा टिझर बघून ते अतिशय प्रभावित झाले.

राजामौली यांच्यासोबत झालेल्या या भेटीने दिग्दर्शक प्रविण तरडे अतिशय भारावून गेले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "राजामौली सरांना मी कायमच माझा आदर्श मानत आलेलो आहे. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ज्या भव्य दिव्यतेने जगभरात पोहचवला तसंच काही तरी भरीव आपल्याला मराठी चित्रपटाबद्दल करता यावं हीच इच्छा कायम मनात आहे. त्यांना भेटण्याची कायमच इच्छा होती आज धर्मवीरच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. त्यांनी आमच्याशी अतिशय सहृदयतेने संवाद साधला. काही अनुभव, किस्से आमच्याशी शेअर केले. त्यांच्या या भेटीतून आपला मराठी सिनेमा जगाचा सिनेमा बनवण्यासाठीची एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली."

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

या भेटीबद्दल निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, "जेव्हा बाहुबली चित्रपट बघितला होता तेव्हा कधीच विचार केला नव्हता की बाहुबलीच्या जन्मदात्याला भेटण्याची संधी मिळेल. पण आज तो योग जुळून आला. त्यांना भेटण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती, थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा समोर आले, आमच्याशी बोलले तेव्हा हे दडपण आपोआप गळून पडलं. चेहऱ्यावर किंवा वागण्यात कसलाही बडेजाव नसलेलं, अतिशय साधं व्यक्तिमत्त्व म्हणजे राजामौली सर हे या भेटीत जाणवलं." (हे देखील वाचा: Unaad Movie: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘उनाड’ चित्रपटाची झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड)

चित्रपटाचा टिझर त्यांना दाखवला असता ते म्हणाले की ही भाषा जरी मला कळत नसली तरी चित्रपटाचा लुक मला आवडला. कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत सर्वच उत्तम जमून आलंय. त्यांनी दिलेली ही दाद, ही प्रतिक्रिया आमच्यासाठी फारच मोलाची आहे. त्यांच्याकडून अतिशय सकारात्मक अशी ऊर्जा आम्हांला मिळाली आहे.' झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.