काही कलाकारांच्या जोडया या चित्रपटाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकांनाही त्यांना एकत्र पहाण्यात मजा येते. तर काही नवीन जमलेल्या जोडया आपल्या एकत्र येण्यातून उत्सुकता निर्माण करत असतात. अशीच एक जोडी आगामी चाबुक चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. ही जोडी आहे अभिनेता मिलिंद शिंदे आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांची. बॉलीवूडपटांच्या सिनेमॅटोग्राफी आणि सहाय्यक दिग्दर्शनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या कल्पेश भांडारकर यांनी प्रथमच स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. श्रीसृष्टी मोशन पिक्चर कंपनीची प्रस्तुती असलेल्या चाबुक चित्रपटाची निर्मीती सुद्धा कल्पेश भांडारकर यांनी केली आहे. येत्या 25 फेब्रुवारीला चाबुक चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे बंधू असलेल्या कल्पेश यांच्या 'चाबुक' मध्ये समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेता मिलिंद शिंदे यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांपासून ते लघुपटांपर्यंत असंख्य कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. व्यक्तिरेखा कोणतीही असो ती सफाईदारपणे साकारण्यात मिलिंद शिंदे यांचा हातखंड आहे. सूत्रसंचलनाच्या दुनियेत आपला भरीव ठसा उमटवणारे सुधीर गाडगीळ मात्र 'चाबुक' च्या निमित्ताने प्रथमच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असणारे मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ या चित्रपटात सूत्रधाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा काहीशा वेगळ्या असून, या व्यक्तिरेखांची काहीशी अनोखी नावं मुद्दाम गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 'चाबुक' मध्ये मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये गुरु-शिष्याचं नातं पहायला मिळणार आहे. आता यापैकी कोण कोणाचा गुरू? आणि कोणी कोणाचं शिष्यत्व पत्करलंय? हे 'चाबुक' पाहिल्यावरच समजेल. (हे ही वाचा Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: टीव्हीवर पुन्हा दिसणार एकता कपूरचा आयकोनिक शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'; समोर आला प्रोमो (Watch Video)

नायकाच्या भूमिकेत असणाऱ्या समीर धर्माधिकारीच्या खूप जवळ असलेल्या या दोन्ही व्यक्तिरेखा नेमक्या कोणत्या आहेत याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सुधीर गाडगीळ यांनी आजवर जरी अभिनय केलेला नसला तरी, त्यांनी 'चाबुक' मधील व्यक्तिरेखा पूर्ण ताकदीनिशी साकारली असून, प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ठरणार आहे. आजवर कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेला न्यायदेणारे मिलिंद शिंदेही 'चाबुक' मध्ये आजवर कधीही न पाहिलेल्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहेत. अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांनी लिहिलेल्या कथेवर ‘चाबुक’ वाटावी अशी 'चाबुक'ची पटकथा दिग्दर्शक कल्पेश भांडारकर यांनीच लिहिली आहे.