Bhaai - Vyakti Kee Valli: भाई म्हणजेच पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( Purushottam Laxman Deshpande) यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून यंदा महाराष्ट्रात पुलंप्रेमींनी अनेक अनेक उपक्रम हाती घेतले आहे. पुलं देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू रसिकांसमोर रूपेरी पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) उचललं आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच देशापरदेशामध्ये असलेल्या पुलप्रेमींना नव्याने त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या प्रेमात पाडणारी कलाकृती सिनेमागृहात जाऊनच बघायला हवी.
‘भाई – व्यक्ती की वल्ली’ सिनेमा बघायला भाग पाडणारी कारणं -
- ‘भाई – व्यक्ती की वल्ली’- पु लं देशपांडेंचा चरित्रपट
मराठी साहित्याच्या अनेक प्रकारांमधून पुलं देशपांडे यांचे साहित्य तुमच्यासमोर आलं असेल पण पिढ्यान पिढ्या ज्यांचं साहित्य महाराष्ट्रातील वाचकांना खदखदून हसवतय ती व्यक्ती नेमकी कशी होती? त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. पुलंच्या वैयक्तित आयुष्यातील अनेक गोष्टी पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहेत.
- तगडी स्टारकास्ट -
महेश मांजरेकरांचा सिनेमा म्हणजे कलाकारांची फौज असतेच पण ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ सिनेमामध्ये तब्बल 70 कलाकार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पु.ल. देशपांडे यांच्याभोवती सतत माणसांचा गोतावळा असायचा त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्तींचं कास्टिंगदेखील महेश मांजरेकर आणि विक्रम गायकवाड यांनी तितकेच चोखंदळपणे केले आहे.
- दोन भागात प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा-
‘भाई – व्यक्ती की वल्ली’ सिनेमा हा पहिला मराठी सिनेमा आहे जो दोन भागांमध्ये रसिकांसमोर येणार आहे. पु.ल देशपांडे हे व्यक्तीमत्त्वच बहुआयामी असल्याने त्याला दोन भागात रसिकांसमोर ठेवणं हे देखील महेश मांजरेकारांसाठी आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सिनेमाचा पहिला भाग आज 4 जानेवारीपासून रसिकांसमोर येणार आहे तर दुसरा भाग 8 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. Bhaai - Vyakti Kee Valli Trailer : पु.ल.देशपांडे यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर झळकणार, दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा
- सागर देशमुख प्रमुख भूमिकेत
अभिनेता सागर देशमुख हा तसा मराठी सिनेसृष्टीतील नवखा चेहरा आहे पण पु.ल. देशपांडे सारख्या दिग्गज आणि अनेकांच्या जवळच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाच्या रूपात पाहणं ही रसिकांसाठीही ट्रीट असणार आहे. यापूर्वी नाटक, सिरीअल्स यांच्यामधून संजय मोने, अतुल परचुरे,निखिल रत्नपारखी या कलाकारांनी पु.लं देशपांडे रसिकांसमोर ठेवले आहेत पण या सिनेमात पहिल्यांदाच कोणतीही व्यक्तीरेखा यापूर्वी साकरालेल्या कोणत्याच कलाकाराच्या वाट्याला आलेली नाही. सागर देशमुखने पुल देशपांडे यांच्या व्यक्तीमत्त्वाचा महत्त्वाचा टप्पा साकारला आहे. पण त्यासोबतच सक्षम कुलकर्णीने बालपणीचे पुलं साकरले आहेत तर विजय केंकरे यांनीदेखील भाईंच्या आयुष्याचा काही टप्पा साकारला आहे.
- कानडा राजा नव्या रूपात
वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचं अजरामर गाणं 'कानडा राजा पंढरीचा....' हे नव्या स्वरूपात या सिनेमात बांधण्यात आलं आहे. एका मैफिलीतील या गाण्याची झलक ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ सिनेमामध्ये पाहता येणार आहे. नव्या अंदाजातील 'कानडा राजा पंढरीचा' गाणं येथे पहा
- मसालापट नसला तरीही रिफ्रेश नक्की करणार हा सिनेमा
पुलं देशपांडे यांचं साहित्य त्यांच्या सहजसुलभ भाषेमुळे आजही तरूणपिढीला भुरळ पाडतं. एक प्रोफेसर, गायक, लेखक,संगीतकार, कथाकथनकार, अभिनेता असे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू असले तरीही ते उत्तम विचारवंतदेखील होते. वरपाहता साधी, सरळ वाटणारी कथा असली तरीही त्याचा मतितार्थ अनेकदा खूपकाही शिकवून जातो. त्यांच्या विचारातून आपल्या आयुष्यातील अनेक लहान- मोठ्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहे.
तुम्ही पुल देशपांडे यांचं साहित्य कधीच वाचलं नसलं तरीही हा सिनेमा पहायला जाऊच शकता. सध्या सिम्बा सिनेमासमोर या चित्रपटाला स्क्रिन मिळण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे रसिकांनीच दर्जेदार कलाकृतीला साथ देणं गरजेचे आहे. पायरसी टाळा आणि या सिनेमाला थिएटर्समध्ये पाहून आनंद लूटा !