अभिनेत्याला ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्या प्रकरणी मराठी अभिनेत्री सारा श्रवणला अटक
सारा श्रवण (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेता सुभाष यादव (Actor Subhash Yadav) याने, अभिनेत्री सारा श्रवण व सहाय्यक अभिनेत्री रोहिणी माने या आपल्यासोबत खंडणीखोरी करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुणे पोलीस गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) रोहिणी माने हिला अटक केली होती. आता अभिनेत्री सारा श्रवणला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा यूनिट दोनने रात्री मुंबईमधून तिला अटक केली आहे. हा गुन्हा खंडणीसारखा गंभीर असल्याने, साराचा अटकपूर्व जमीन कोर्टाने फेटाळून लावला होता. यापूर्वी रोहिणीचा साथीदार राम भरत जगदाळे यालाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी माने व सारा श्रावण यांनी अभिनेता सुभाष यादव याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. या आरोपानंतर आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुभाष यादव यालाही अटक केली होती. सुभाष यादव याने हे आरोप खोटे असून, दहशतवाद विरोधी पथक उपनिरीक्षक अमोल टेकाळे, हे रोहिणी माने हिला खंडणी प्रकरणात मदत करत असल्याची माहिती दिली. त्यानंतरच्या तपासानंतर पुणे पोलीस क्राईम ब्रँच पथकाने पोलिस उपनिरीक्षक अमोल टेकाळे व रोहिणीला अटक केली. या दरम्यान सारा दुबईला पळून गेली होती. (हेही वाचा: मराठी अभिनेत्री रोहिणी माने हिला अटक; पुणे पोलिसांनी लातूर येथे ठोकल्या बेड्या)

हा प्रकार सप्टेंबर 2018 मध्ये घडला होता. चित्रपटानंतर सुभाषला मिळालेली प्रसिद्धी मानेला पाहवली नव्हती, तसेच ती लग्नासाठी सुभाषच्या मागे लागली. सुभाष भाव देत नाही हे पाहून तिने त्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागायला सुरुवात कली. तसेच त्याची सोशल मिडियावर बदनामीही केली. त्यानंतर मात्र सुभाषने पुणे पोलीस आयुक्तांना ही माहिती दिली. व पुढील तपासात या सर्व बाबी समोर आल्या. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.