Ashi Hi Aashiqui Trailer: अभिनय बेर्डे, हेमल इंगळे यांचा रोमॅन्टिक सिनेमा 'अशी ही आशिकी'चा ट्रेलर,1 मार्चला सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला
Ashi Hi Aashiqui (Photo Credits: You Tube)

Ashi Hi Aashiqui Trailer: अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आणि हेमल इंगळे (Hemal Ingle) या नव्या जोडीची हलकी फुलकी रोमॅन्टिक कहाणी 'अशी ही आशिकी' (Ashi Hi Aashiqui) या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रीलिज करण्यात आला होता. सिनेमाची गाणी आणि टीझर यांना रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता या नव्या जोडीची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.अशातच आज व्हेलेंटाईन डे (Valentine's Day) दिवशी अशी ही आशिकी या सिनेमाचा ट्रेलर इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. Ashi Hi Ashiqui Song: 'अशी ही आशिकी' गाण्यात अभिनय बर्डे-हेमल इंगळे यांचा रोमांटिक अंदाज!

'स्वयम'(अभिनय बेर्डे)  आणि 'अमरजा' (हेमल इंगळे) या तरूण जोडप्याची रोमॅन्टिक कहाणी सिनेमामध्ये दाखवण्यात आली आहे. अल्लड वयातील प्रेम, त्यामध्ये घ्यावे लागणारे काही साहसी निर्णय यामधून तावून सुलाखून निघाल्यानंतर या जोडीच्या आयुष्यात प्रेम कायम राहतं का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आजच्या तरूणाईचा रिलेशनशीपकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सिनेमातून दाखवण्यात आला आहे.

गुलशन कुमार प्रस्तुत आणि टी-सिरीजचे भूषण कुमार, क्रिशन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.मुव्हिंग पिक्चर्स, सुश्रिया चित्र, वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे सुध्दा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटाच्या माध्यमातून टी-सिरीज पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा 1 मार्च 2019 दिवशी रीलीज होणार आहे. पाच वर्षांनंतर सचिन पिळगावकर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे.