विनोदी अभिनेते संतोष मयेकर काळाच्या पडद्याआड
अभिनेते संतोष मयेकर (Photo credits: Facebook)

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन झाले. मयेकर हे गेले दीर्घ काळ मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहेत.

प्रेक्षकाच्या मनापर्यंत पोहोचणारी संवादफेक, उत्कृष्ट अभिनय आणि त्याच्या जोडीला विनोदाचे अचूक टायमिंग आणि भाषेवरील प्रभुत्व ही मयेकर यांची खास वैशिष्ट्ये. त्यांच्या जाण्याने नाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. (हेही वाचा, मराठी माणसाचं वस्त्रहरण करायला तात्या सरपंच आणि मंडळी पुन्हा रंगभूमीवर अवतरले)

अभिनेते संतोष मयेकर (Photo credits: Facebook)

'ऑल दी बेस्ट' ,'वस्त्रहरण' 'देवाशप्पथ खोटे सांगेन', 'चष्मेबहाद्दर', 'गलगले निघाले', 'आर्त', 'दशक्रिया' आदी नाटकांतील अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. विशेषत: 'ऑल दी बेस्ट' या सुपरहिट नाटकाच्या दुसऱ्या संचात त्यांनी साखारलेली बहिऱ्याची भूमिका विशेष भाव खाऊन गेली. तर, 'वस्त्रहरण' या नाटकाच्या अडीचशेहून अधिक प्रयोगांमध्ये त्यांनी साकारलेला तात्या सरपंच त्यांच्यातील अभिनयाचा वेगळा पैलू दाखवणारा ठरला.