व्हिडीओ : महिला पैलवानने राखी सावंतला जमिनीवर आदळले; जखमी राखी हॉस्पीटलमध्ये भरती
राखी सावंत (Photo Credits: Facebook and Youtube)

स्वतःला डान्स क्वीन समजणाऱ्या राखीने नुकतेच ‘सुरैय्या’ गाण्यावर बिकिनी डान्स करून धुमाकूळ घातला होता, तर आता अजून एका कार्यक्रमातील डान्स राखीच्या चांगलाच अंगलटी आला आहे. इतका की राखी सावंतला चक्क हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. होय एका कार्यक्रमात एका महिला पैलवानने राखीला चक्क हवेत उचलून जमिनीवर जोरदार आपटले आहे. यामुळे राखीच्या कमरेला मार लागला असून तीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

तर, हरियाणातील पंचकुला येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (CWE) बॅनरखाली रंगलेल्या रेसलिंग स्पर्धेत राखी सावंतने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रेबेल ही परदेशी महिला पैलवान आखाड्यात उतरली, आणि तिने पंचकुलाच्या महिलांना आखाड्यात येण्याचे आव्हान दिले. यावेळी राखी सावंत मोठ्या आत्मविश्वासाने या महिला पैलवानला भिडण्यासाठी आखाड्यात उतरली. सुरुवातीला राखीने या रेसलरला नृत्याचे आव्हान दिले. साहजिकच ही महिला पैलवान असल्याने आखाड्यात तिचाच दरारा अधिक होता, मात्र राखीदेखील स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत होती. दोघींच्या या रंगलेल्या सामन्यात विदेशी महिला रेसलरला आव्हान देणे राखीला महागात पडले. गाणे थांबल्यानंतर विदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीला हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले.

जवळजवळ 8 मिनिटे राखी तशीच जमिनीवर पडून होती, त्यानंतर आयोजकांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले. बिग फाईटदरम्यान रविवारी महिला रेसलर्सची स्पर्धा आयोजित केली गेली होती. यादरम्यान विदेशी रेसलर रेबलने फाईट जिंकल्यानंतर ओपन चॅलेंज दिले होते. राखीने हे आव्हान स्वीकारले मात्र याचे चांगलेच फळ तिला भोगावे लागले.