हिंदी मालिका तसेच सिनेमांमध्ये स्वत:ची वेगळी छाप सोडलेला अभिनेता कुशल पंजाबी (Kushal Punjabi) याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार, कुशलने आपल्या घरी गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांना त्याच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण हिंदी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. कुशल पंजाबी या कलर्स वाहिनीवरील 'इश्क में मरजांवा' या मालिकेत दिसला होता. कुशलचे जाणे हे त्याच्या कुटूंबाइतकचे त्याच्या मित्रपरिवारासाठी धक्कादायक आहे. वयाच्या 37 वर्षी कुशलने आत्महत्या का केली असावी यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. कुशल च्या मागे त्याची पत्नी आणि एक मुलगा आहे.
कुशल ने आपल्या करियरची सुरुवात 2000 ग्लॅडरेक्स मॅनहंट स्पर्धेपासून झाली होती. त्यानंतर त्याने CID, कभी हां कभी ना, कसम से, राजा की आएगी बारात, रास्ता डॉट कॉम सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तसेच लक्ष्य, काल आणि सलाम ए इश्क, दन दना दन गोल सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते.
हेदेखील वाचा- हिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु
कुशल च्या निधनानंतर हळवा झालेला त्याचे खास मित्र अभिनेता करणवीर बोहरा याने एक भावूक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.
तुझे आमच्यातून असे अचानक जाणे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुझ्या जाण्याने मी पूर्णपणे मानसिकरित्या कोलमडलो आहे. मी तुला खूप खूप मिस करतो. तुझ्या आत्म्यास शांती लाभो असे करणवीर बोहरा याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कुशलचे हिंदी कलाविश्वात तसेच खाजगी आयुष्यात सर्व ठिकठाक चालू असताना त्याने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न त्याच्या मित्रपरिवाराला तसेच त्याच्या कुटूंबियांना पडला आहे.