Ketaki Chitale Post On Shivaji Maharaj (Photo Credits: File Image)

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapti Shivaji Maharaj) एकेरी उल्लेख केलेल्या कॉमेडियन अग्रीमा जोशुआ (Agrima Joshua) हिचा एक जुना व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे, महाराजांचे नाव एकेरी घेणाऱ्या अग्रीमावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे, या सर्व प्रकरणात मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने उडी घेत आता हाच शिवप्रेमींचा रोष स्वतःवर ओढवून घेतला आहे. अग्रीमा ची बाजू घेत केतकीने फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने नुसतं शिवाजी नाव ऐकून पेटून उठू नका जरा शिकून घ्या अशा शब्दात सल्ले दिले आहेत. अनेकांना मजकूर कळातच नाही, तेवढी बुद्धीमत्ताच नाही, हेच 3 वर्षाच्या मुलाची बुद्धी असणारे स्वघोषित मावळे आपल्या वागण्याने आपली लायकी दाखवून देत आहेत. अशा शब्दातून केतकीने शिवप्रेमींची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही पोस्ट आता तिच्यावरच उलटून लोकांनी तिलाच आता टार्गेट केले आहे. या पोस्ट खाली असणाऱ्या जवळपास दीड हजार कॉमेंट्स मधून सर्वांनीच केतकीवर टीकास्त्र उगारले आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या..

कॉमेडियन अग्रीमा जोशुआ कडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कारवाईसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गृहमंत्र्यांना पत्र

काय आहे केतकी चितळे ची फेसबुक पोस्ट

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर 'मराठी' असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे 20 ते 25 वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!!

सुधारणा करा बाळांनो, शिका.

दरम्यान, या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स मध्ये नेटकऱ्यांनी केतकीचीच डोळेउघडणी केली आहे. सर्व इतिहास केवळ आपल्यालाच माहीत आहे असं समजू नये आणि शिवाजी महाराज हा कॉमेडीचा विषयच नाही किंवा निदान नाव घेत असल्यास आहे तसे मानाने घेणे आवश्यक आहे इतकीच मागणी आम्ही करत आहोत असे मत आणि पोस्ट वरची नाराजी अनेक शिवभक्तांनी व्यक्त केले आहे.