Coronavirus चा सामना करण्यासाठी, 21 वर्षीय गायक Shawn Mendes कडून 1 लाख 75 हजार डॉलर्सची मदत
Shawn Mendes (Photo Credits: Twitter)

आजकाल संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढत आहे. अनेक देशांनी अशा कठीण काळात आपल्या आरोग्यसेवेवर भर देण्यासाठी आपल्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. या संकटकाळात लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक हॉलिवूड कलाकारांनी कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अशात प्रसिद्ध हॉलिवूड गायक शॉन मेंडिस (Shawn Mendes) याने कोरोना संक्रमित मुलांना वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 21 वर्षीय शॉनने कॅनडामधील एका मुलांच्या रूग्णालयाला (SickKids) सुमारे 1 लाख 75 हजार डॉलर्स (जवळजवळ 1.31 कोटी रुपये) दान केले आहेत. शॉनने याबाबत सोशल मिडियावर एक मोठी पोस्ट लिहून याची घोषणा केली आहे.

शॉन पीटर राउल मेंडिस हा एक कॅनेडियन गायक, गीतकार आणि मॉडेल आहे. ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळवलेला शॉन कॅनडा येथे राहतो. त्याने ही मदत त्याच्या मूळ गावातील टोरंटो येथील रुग्णालयाला केली आहे. स्वतः शॉनदेखील एक स्वयंसेवी संस्था चालवतो. या निधीतून रुग्णालय कोरोना बाधित मुलांसाठी आवश्यक औषधे आणि इतर गोष्टी खरेदी करेल.

याबाबत बोलताना शॉन म्हणतो, 'SickKids ला ही देणगी देऊन आम्ही या रुग्णालयातील रुग्णांना आणि टोरोंटोच्या आसपासच्या समुदायासाठी, त्वरित तपासणी तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इतर सहाय्य उपलब्धतेची आशा व्यक्त करत आहे. पुढील महिन्यात, आम्ही SickKids च्या अतिरिक्त प्रयत्नांसाठी देणगी देण्यासाठी 'द शॉन मेंड्स फाऊंडेशन'ला निर्देश देऊ. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू असलेल्या, कोरोना व्हायरस रिस्पॉन्स फंडद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांनाही पाठिंबा देऊ.' (हेही वाचा: प्रियंका चोप्रा हिने पूर्ण केले Safe Hand Challenge; व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन, निक जोनस सह परिणीति चोप्रा हिला केले नॉमिनेट)

दुसरीकडे शॉनची पार्टनर कॅमिला कॅबेलोनेही तिचा आगामी दौरा पुढे ढकलला आहे. 'बिलबोर्ड'नुसार 26 मे रोजी नॉर्वेच्या ओस्लो येथे हा दौरा सुरू होणार होता. दरम्यान कॅनडामध्ये, 2800 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, कॅनडामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 27 मृत्यू झाले आहेत.