Naya Rivera Death: 6 दिवसानंतर तलावामध्ये सापडला हॉलीवूड अभिनेत्री ‘नाया रिवेरा’चा मृतदेह; पोहताना अचानक झाली होती गायब
Naya Rivera (Photo Credits: Twitter)

काही दिवसांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री नाया रिवेरा (Naya Rivera) तलावामधून अचानक गायब झाल्याची बातमी आली होती. त्यावेळी फक्त नायाचा 4 वर्षांचा मुलगा बोटीमध्ये सापडला होता. त्याच दिवसापासून नायाचा शोध चालू होता व आता नायाचा मृतदेह सापडला आहे. तलावात पोहताना 33 वर्षीय नायाचा मृत्यू (Naya Rivera Death) झाल्याचे समोर येत आहे. बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये नाया दिसली होती व ‘Glee’ या हिट म्युझिकल सिरीजमुळे ती लोकप्रिय ठरली होती. सहा दिवसानंतर, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या लेक पीरूजवळ नायाचा मृतदेह सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, नायाने तिच्या 4 वर्षाच्या मुलासह 8 जुलै रोजी दुपारी 3 तासासाठी कॅलिफोर्नियाच्या पेरु लेकमध्ये एक बोट भाड्याने घेतली होती. तीन तासांनंतर, जेव्हा ही बोट वेळेत परतली नाही, तेव्हा कर्मचारी बोटीकडे पोहोचले, जिथे त्यांना नायाचा मुलगा 'जोसे' सापडला, परंतु नाया गायब होती. अभिनेत्री आपल्या मुलासह तलावामध्ये पोहत होती आणि फक्त तिचा मुलगाच बोटीपर्यंत पोहचू शकला. पोलिसांनी त्याच दिवसापासून सर्च ऑपरेशन सुरु केले होते. आता 6 दिवसानंतर नायाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. (हेही वाचा: हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘नाया रिवेरा’ पोहायला गेली असता तलावामधून अचानक गायब; बोटीवर सापडला 4 वर्षांचा एकटा मुलगा)

नाया रिवेरासंदर्भात पत्रकार परिषद घेताना व्हेंचुरा काउंटीचे शेरीफ बिल अयूब म्हणाले की, रिवेराचा मृतदेह सापडला आहे, मात्र प्राथमिक चाचणी दरम्यान आत्महत्येचा पुरावा मिळालेला नाही. अपघातामुळे नायाचा बुडून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. अयूब पुढे म्हणाले, ‘कदाचित बोट बुडत होती व ती हाताळणे नायाला एकटीला शक्य झाले नाही. त्यानंतर तिने आपल्या मुलाला बोटीवर चढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, परंतु, स्वतःचे रक्षण करण्यासाठी ती शक्ती उरली नव्हती व ती मरण पावली. नायाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे तिच्या मुलावरील असलेले प्रेम दिसून येते. तिची शेवटची पोस्ट देखील तिच्या मुलासमवेत आहे.