Justin Bieber Cancels World Tour: प्रकृती अस्वास्थ्यामुळे जस्टिन बीबरने रद्द केली वर्ल्ड टूर; भारतामधील शोबाबत संभ्रम कायम
Justin Bieber (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध हॉलिवूड गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) बऱ्याच दिवसांपासून आजारी  आहे. काही काळापूर्वी गायक रामसे हंट सिंड्रोमने (Ramsay Hunt Syndrome) ग्रस्त होता. मात्र, गेल्या महिन्यातच त्याने आपण यातून बरे झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर त्याने आपल्या ‘जस्टिस’ या अल्बमसाठी ‘वर्ल्ड टूर’ची घोषणा केली होती. जस्टिनच्या या वर्ल्ड टूरमध्ये केवळ भारतच नाही तर, इटली, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचाही समावेश होता. मात्र आता माहिती मिळत आहे की, जस्टिनची ही टूर रद्द झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जस्टिन बीबरने त्याचा दौरा पुढे ढकलला आहे.

जस्टिन बीबरचे युरोप आणि ब्राझीलमध्ये जवळपास सहा लाईव्ह शो झाले होते. यानंतर नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे. जस्टिन बीबरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- ‘जस्टिस वर्ल्ड टूरची घोषणा. या वर्षाच्या सुरुवातीला, मी रामसे हंट सिंड्रोमशी झालेल्या लढाईबद्दल सार्वजनिकपणे सांगितले, जिथे माझ्या चेहऱ्याबाबत समस्या उद्भवल्या. त्यानंतर मी माझी उत्तर अमेरिकेची टूर पूर्ण करू शकलो नाही. माझ्या डॉक्टरांच्या, कुटुंबाच्या आणि टीमच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर, मी पुढे युरोपच्या दौर्‍यावर गेलो, जिथे मी सहा लाइव्ह शो केले.’

तो पुढे म्हणतो, ‘मात्र आता माझ्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे,  त्यामुळे मी बरा होणार आहे. मला विश्रांती घेण्यासाठी आणि बरे होण्यासाठी वेळ हवा आहे. तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो.' जस्टिन 18 ऑक्टोबरला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. मात्र आता या घोषणेनंतर भारतामधील शोबाबत संभ्रम आहे.

दुसरीकडे News18 च्या वृत्तानुसार, बुक माय शो (Book My Show) ने स्पष्ट केले आहे की, जस्टिनचा आशिया दौरा नियोजित तारखेप्रमाणे होईल. ते म्हणाले, ‘आम्हाला माहिती आहे की जस्टिन बीबरने टूरिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिनला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. त्याच्या तब्येतीला प्रथम स्थान देण्याच्या त्याच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो. आमची समजूत आहे की त्याचा भारतासह आशिया दौरा हा नियोजित शेड्यूलप्रमाणे पूर्ण होईल. (हेही वाचा: मनोरंजन विश्वात Barack Obama यांची धमाकेदार एन्ट्री; नेटफ्लिक्स सिरीजसाठी मिळाला प्रतिष्ठेचा Emmy पुरस्कार)

दरम्यान, या वर्षी मार्चमध्ये ‘जस्टिस’ ही वर्ल्ड टूर सुरू करण्यात आली होती. यामध्ये जस्टिनचे दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमध्ये मार्च 2023 पर्यंत 70 शो आयोजित केले होते. जस्टिनने वयाच्या 13 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवली होती. त्याने 'बेबी' आणि 'बिलीव्ह' सारखे अनेक हिट चार्टबस्टर दिले आहेत.