95th Academy Awards: भारताकडून Oscars 2023 साठी पाठवण्यात येणार गुजराती चित्रपट Chhello Show; द कश्मीर फाइल्स आणि आरआरआरला मागे टाकून मिळवला मान 
Chhello Show (Photo Credits: YouTube)

भारताकडून ऑस्कर 2023 (Oscars 2023) साठी पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. पुढील वर्षांच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून गुजराती चित्रपट 'चेल्लो शो' (Chhello Show) पाठवण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष आतापर्यंत तरी बऱ्याच चढ-उतारांनी भरलेले ठरले. गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ मोठ बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले, तर  तर काही दक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आरआरआर, काश्मीर फाइल्स, पुष्पा अशा चित्रपटांसाठी चित्रपटगृहांमध्ये बरीच गर्दी झाली. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या ऑस्कर एन्ट्री चित्रपटाची चर्चा होती.

यावर्षी भारताकडून कोणता चित्रपट 'ऑस्कर 2023'मध्ये प्रवेश करू शकतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. यंदाचा हा मान कश्मीर फाइल्स किंवा आरआरआरला मिळण्याची शक्यताही वर्तवली होती. मात्र यामध्ये या सर्व चित्रपटांना मागे टाकत 'चेल्लो शो' या गुजराती चित्रपटाने ऑस्कर 2023 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. भारतीय फिल्म फेडरेशनने 'चेल्लो शो' या गुजराती चित्रपटाची निवड केली आहे. हा चित्रपट भारताने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट श्रेणीसाठी पाठवण्याचे ठरवले आहे. (हेही वाचा: Vivek Agnihotri On Bollywood: बॉयकॉट ट्रेंड हा एक चांगला ट्रेंड; याचे परिणाम खूप सकारात्मक होतील - विवेक अग्निहोत्री)

पान नलिन दिग्दर्शित या चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2021 मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये चेल्लो शोने 66 व्या वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन स्पाइक जिंकला होता. गेल्या वर्षी, विनोदराज पीएस यांनी दिग्दर्शित केलेला तमिळ चित्रपट ‘कूझंगल’, ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी निवडला होता.

आतापर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला फिचर फिल्म श्रेणीत ऑस्कर मिळालेले नाही. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर श्रेणीत अंतिम पाचमध्ये स्थान मिळवणारा शेवटचा भारतीय चित्रपट 2001 मध्ये आशुतोष गोवारीकरचा, आमिर खान-स्टार ‘लगान’ होता. शीर्ष पाचमध्ये स्थान मिळवणारे इतर दोन भारतीय चित्रपट म्हणजे मदर इंडिया (1958) आणि सलाम बॉम्बे. (1989). पुढील वर्षी 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाईल.