27 मार्च रोजी लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे होणार्या 'ऑस्कर अवॉर्ड्स' (Oscars 2022) सोहळ्यासाठी मनोरंजन नगरी सज्ज होत आहे. चित्रपट विश्वातील ही एक सर्वात खास रात्र असणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा ऑस्कर पुरस्कार म्हणजेच 94 वा अकादमी पुरस्कार (94th Academy Awards) सोहळा पार पडणार आहे. या अवॉर्ड शोसाठी सुप्रसिद्ध हॉलिवूड कलाकारांसह चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठीची नामांकने गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती.
यंदा आठ श्रेणीतील पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे प्री-ऑस्कर इव्हेंट लवकरच होणार आहे, पण आनंदाची बाब म्हणजे, प्रियांका चोप्रा हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. हा कार्यक्रम बेव्हरली हिल्समध्ये आयोजित केला जाईल.
94 वा अकादमी पुरस्कार 27 मार्च रोजी रात्री लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहे, परंतु वेळेतील फरकामुळे, आपण सोमवारी, 28 मार्च रोजी भारतात त्याचे प्रसारण पाहू शकतो. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यूएसमध्ये 27 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता सुरु होईल. भारतात 28 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता अकादमी पुरस्कार पाहता येऊ शकेल. हा सोहळा वेबसाईट्सवर तसेच टीव्ही चॅनेलवर पाहता येईल. स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर सकाळी 6.30 वाजता हा शो प्रसारित होईल. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवरदेखील याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. (हेही वाचा: Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला टायटॅनिक फेम अभिनेता Leonardo Dicaprio; 76 कोटीं रुपये केले दान)
तब्बल 3 वर्षांनंतर अकादमी पुरस्कारांचे आयोजन 'ऑन ग्राउंड' होत आहे. यापूर्वी हा अवॉर्ड शो कोरोना महामारीमुळे व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यामुळेच यावेळी तीन सेलिब्रिटी हा शो होस्ट करताना दिसणार आहेत. कॉमेडियन एमी शुमर, रेजिना हॉल आणि वांडा सायक्स 94 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करणार आहेत.