Riteish Deshmukh Ganpati Idol (Photo Credits: Twitter)

सण आणि प्रदूषण हे ठरलेली जोडगोळी तोडून काढत यंदा अनेकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विडा उचलला आहे. बाप्पाच्या मूर्तीपासून ते आरास बनवण्यापर्यंत सर्व काही इको फ्रेंडली (Eco Friendly Ganeshotsav) पद्धतीने करण्यावर सर्वांचा भर आहे. मग यामध्ये बॉलिवूडकर मंडळी का मागे राहतील? गणेशोत्सवाला निसर्गाचे रक्षण करण्याची शिकवण देत हिंदी सिनेसृष्टीतला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने यंदा आपल्या घरी मातीचा बाप्पा बसवला आहे. विशेष म्हणजे ही बाप्पाची मूर्ती रितेशने स्वतःच्या हाताने तयार केली आहे. मातीचा एक मोठा गणपती आणि चिकणमातीचे अन्य छोटे छोटे चार गणपती साकारतानाचा एक व्हिडीओ सुद्धा रितेशने आपल्या फॅन्स सोबत शेअर केला आहे. (Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?)

रितेशने व्हिडीओ शेअर करताना त्यासोबतच एक खास संदेशही आपल्या फॅन्सना दिला आहे. रितेशने या संदेशात "मी, आज स्वतः माती व चिकणमाती वापरून घरीच बाप्पाची मूर्ती बनवली आहे, मला माझ्या निसर्गाच्या रक्षणाप्रती जबाबदार व्हायचे आहे, आपल्या येत्या पिढीला एक स्वच्छ आणि चांगले पर्यावरण लाभावे यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. आपली मुले आपल्याकडे बघूनच शिकतात त्यामुळे आपण योग्य वर्तवणूक ठेवायला हवी असे म्हणत सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख ट्विट

दरम्यान, याआधी सुद्धा रितेश देशमुखने 'Thank God Bappa' यासारख्या व्हिडिओतून मार्मिक अंदाजात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना निसर्गाची राखण करण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय गणेशोत्सवाच्या दरम्यान त्याची नवनवीन चित्रपटातील गाणी प्रदर्शित होत असतात. यंदा देखील आयुष्यमान खुराना याच्या येऊ घातलेल्या ड्रीम गर्ल सिनेमातील 'ढगाला लागली कळ' या गाण्यात त्याने गणपती डान्स केलेला पाहायला मिळत आहे.