60 वर्षांहून अधिक काळ रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे (Arun Kakade) यांचे आज दु:खद निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. आविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबासह संपुर्ण रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अरुण काकडे हे 94 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही होते.
आविष्कार नाट्यसंस्थेचे भक्कम आधारस्तंभ म्हणून काकडे काकांकडे पाहिले जात होते. ही संस्था आज मोठी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. वयाची 85 वर्षे पार करुनही सध्याच्या तरुणांना लाजवेल अशा उत्साहात उत्साहात आविष्कारच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन नाटकं आपल्यासमोर आणली. त्या नाट्यवर्तुळात सर्व लोक काकडे काका असे म्हणत. काकडे काकांनी आपली रंगभूमीवरची वाटचाल पुण्यातून सुरु केली. मात्र त्यांच्यातला रंगकर्मी त्याला मुंबईत घेऊन आला.
हेदेखील वाचा- मराठीत गाजलेले तुफान विनोदी एकपात्री प्रयोग
आविष्कार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासह त्यांनी रंगभूमीची सेवा केली.
त्यांचे अमका हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.