नाटक पाहायला येणा-या प्रेक्षकांना वारंवार सांगूनही नाटक सुरु असताना मोबाईल चालू ठेवणे आता नाट्य कलावंतांना रोजचेच झाले आहे. नाटक सुरु असताना मोबाईल वाजण्याचा परिणाम नाटक रंगभूमिवर प्रयोग करत असलेल्या कलाकारांच्या भूमिकेत व्यत्यय आणतो ही साधी सरळ गोष्ट नाट्यरसिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale), सुमित राघवन (Sumeet Raghavan) यांच्यासह अनेक कलाकारांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. एवढच नव्हे तर विक्रम गोखले सुरु असलेला प्रयोग ताबडतोब थांबवला होता. त्यातच आता अभिनेता सुबोध भावे याने प्रयोगादरम्यान मोबाईल वाजण्यावर तीव्र नाराजी व्यक्त करुन त्या संदर्भात एक ट्विट केले आहे. प्रेक्षकांच्या या चुकीमुळे कदाचित आपण रंगभूमीला कायमचा रामराम करु असे सांगितले आहे.
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी या ट्विटच्या माध्यमातून प्रयोगादरम्यान मोबाईल वाजण्याच्या गोष्टीवर आक्षेप घेत जर असेच चालू राहिल्यास आपण यापुढे रंगभूमिवर काम न केलेले बरे असे म्हटले आहे.
अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही.
यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं.
म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको.कारण फोन जास्त महत्त्वाचा
— सुबोध भावे (@subodhbhave) July 28, 2019
अनेकवेळा सांगूनही जर नाट्यगृहात नाटक सुरु असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतील, याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक एकरुप होऊन बघण्याची त्यांना गरज वाटत नसावी, असे परखड शब्दांत सुबोधने आपले मत मांडले आहे.
हेही वाचा- मुंबई: मोबाईलच्या व्ययत्यामुळे 'लाईव्ह शो' चा रसभंग टाळण्यासाठी BMC नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवणार?
सुबोध सध्या 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात काम करत आहे. नाटक सुरु असताना जर मोबाईल वाजला तर सुजाण प्रेक्षक आणि रंगमंचावर काम करणारे कलाकार या दोघांनाही त्याचा त्रास होतो. याबाबत नाट्यगृहात प्रयोग सुरु होण्याआधी विनंतीही केली जाते. तरीही अनेकदा प्रयोगादरम्यान मोबाईल वाजण्याच्या घटना घडतातच. आता याबाबत अभिनेता सुबोध भावेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.