कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा अमेरिका दौरा रद्द; सुबोध भावे याची खास पोस्ट
Subodh Bhave | (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांनामध्ये चांगलीच दहशत पसरली असून अनेक उद्योगधंदे, व्यवसायांवर याचा परिणाम जाला आहे. तसंच थिएटर, मॉल, शाळा काही ठराविक काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसचा परिणाम सिने, नाट्यसृष्टीवर देखील झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याच्या 'अश्रूंची झाली फुले' नाटकाचा अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे. याची माहिती सुबोध भावे याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. (IIFA 2020 पुरस्कार सोहळ्यावर कोरोना व्हायरसचं सावट; इंदौर मधील 27-29 मार्च दरम्यान आयोजित कार्यक्रम पुढे ढकलला)

27 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान अमेरिकेत या नाटकांचे प्रयोग होणार होते. मात्र कोरोना व्हायरसची जगभरात वाढत जाणारी दहशत लक्षात घेता हे प्रयोग रद्द करण्यात आले असून परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत परदेशात नाटकाचे दौरे होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच आता अमेरिकेत या नाटकाचे प्रयोग फेब्रुवारी 2021 मध्ये होतील, अशी माहिती पोस्टद्वारे देण्यात आली आहे.

सुबोध भावे याची पोस्ट:

तसंच सुबोध भावे याने खास पोस्ट करत प्रेक्षकांना काळजी घेण्याचेही सूचित केले आहे. कोरोना हा विनोदाचा विषय नसून ज्यांचा जीव गेलाय किमान त्यांचे तरी भान ठेवूया. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. सुरक्षित रहा, अशी पोस्ट सुबोधने केली आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसह परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड सिनेमांचे परदेशातील शूटिंग रद्द करण्यात आले आहे. तर काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.