महिला कॉंग्रेसची निदर्शने; नाना पाटेकरांच्या अटकेची मागणी
नाना पाटेकर (Image Credit: Stock Photo/File)

#metoo चळवळी अंतर्गत तनुश्री दत्ता हिने केलेल्या आरोपांना आता वेगळेच वळण लागले आहे. अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह राकेश सारंग आणि निर्माता सामी सिध्दिकी, यांच्यावर तनुश्री दत्ता हिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तब्बल चार तास जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या गोष्टीची चौकशी करणार आहेत.

दरम्यान महिला कॉंग्रेसच्या वतीने नाना पाटेकर यांना तत्काळ अटक व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत महिलांनी निदर्शनेदेखील करायला सुरुवात केली आहे. 'नाना पाटेकरांना अटक करा' अशी घोषणाबाजी महिला कॉंग्रेसने पोलीस स्टेशनसमोर केली.

2 दिवसंपुर्वी तनुश्री दत्ताने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. महिला आयोगाकडेही तक्रार दाखल करून न नाना पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तिने केली होती. महिला आयोगाने या तक्रारीची दाखल घेत 10 दिवसांत या चौघांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यामुळे नाना पाटेकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच नाना पाटेकर प्रसारमाध्यमांसमोर आले होते. मात्र, वकिलांनी मला काहीही बोलण्यास मनाई केली आहे, असे सांगत नाना यांनी अवघ्या अर्ध्या मिनिटांत पत्रकार परिषद आटोपती घेतली होती.