Representative Image

केरळमध्ये (Kerala) प्रथमच कोची शहर पोलिसांनी नकारात्मक ऑनलाइन चित्रपट रिव्ह्यूविरुद्ध (Negative Reviews) गुन्हा नोंदवला आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘राहेल माकन कोरा’ (Rahel Makan Kora) या चित्रपटासाठी नकारात्मक रिव्ह्यू करणाऱ्या नऊ लोकांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नऊ आरोपींमध्ये यूट्यूब आणि फेसबुकचाही समावेश आहे. राहेल माकन कोराचे दिग्दर्शक उबैनी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

उबैनी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटाची विटंबना करण्याचा तसेच जाणीवपूर्वक नकारात्मक रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोणत्याही चित्रपट निर्मात्याने अशा प्रकारची तक्रार केली तर असा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी यापूर्वीच सांगितले होते.

याआधी केरळ उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलीस प्रमुखांना, नवीन चित्रपट प्रदर्शित होत असताना अशा चित्रपटाविरुद्ध विशेषत: सोशल मीडियावर गैरप्रकार निर्माण करणाऱ्या निहित स्वार्थांवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला. सुनावणीदरम्यान, केरळ राज्य पोलीस प्रमुखांनी केरळ उच्च न्यायालयाला सांगितले की, त्यांनी चित्रपट रिव्ह्यू बॉम्बिंगविरूद्ध प्रोटोकॉल तयार केला आहे आणि मुद्दाम नकारात्मक रिव्ह्यू देऊन चित्रपटाची बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (हेही वाचा: अभिनेता RajKummar Rao, Election Commission of India चा National Icon)

उच्च न्यायालयाने हे प्रोटोकॉल स्वागतार्ह पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चित्रपटांना हेतुपुरस्सर लक्ष्य करणाऱ्या अज्ञात समीक्षकांवर कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. न्यायालयाने असेही आदेश दिले आहेत की, निनावी, अशुद्ध कंटेंट प्रसारित करण्यास परवानगी दिली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि आयटी कायद्याच्या तरतुदींनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले होते की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकार्य आहे, परंतु मुद्दाम नकारात्मक रिव्ह्यूजना परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यात अज्ञात आयडींवरील नकारात्मक रिव्ह्यू अजिबात स्वीकारले जाऊ शकत नाहीत.