Diwali निमित्त Box Office ऑफिस वर रंगलेल्या 5 लढती; काहींची 'दिवाळी' तर काहींचं 'दिवाळं'
Box office Clashes | (File Photo)

दिवाळी म्हटली की सगळीकडेच उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. प्रत्येक निर्मात्याला आपला चित्रपट घेऊन दिवाळीला यायचं असतं. अशा वेळेला होतं काय की एकापेक्षा जास्त चित्रपट आपली तारीख एकाच दिवशी निश्चित करून टाकतात. आणि मग सुरु होते दोघांमधली चढाओढ. काही लढती चुरशीच्या होतात, तर काही फुसक्या निघतात. काहींची दिवाळी होते, तर काहींचं दिवाळं निघतं. चला पाहूया अशाच काही लढती.

1. 'डॉन' वि. 'जानेमन'

2006 मध्ये शाहरुख विरुद्ध उभे ठाकले सलमान आणि अक्षय. त्या काळात शाहरुख खानचं गारुड प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होतं. तर दुसरीकडे सलमान आणि अक्षय दोघांच्या करियरची गाडी आत्ताइतकी सुसाट पळत नव्हती. तसेच सुपरहिट डॉनचा रिमेक. अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि शाहरुखच्या डॉनने जानेमनचा सुपडा साफ केला. अर्थात दर्जाच्या बाबतीतही चित्रपट सरसच होता.

2. 'ओम शांती ओम' वि. 'सावरिया'

2007 ला शाहरुख स्टारडमच्या शिखरावर होता तसेच चित्रपटातून दीपिका पदुकोणसुद्धा इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत होती आणि त्याच्या समोर उभे होते २ नवखे कपूर. रणबीर आणि सोनम. नाही म्हणायला सलमान आणि राणी मुखर्जीच्या सहाय्यक भूमिका होत्या. पण तरीही हा चित्रपट दोन कपूर खानदानातल्या नवीन सदस्यांची एंट्री म्हणूनच पाहिला जात होता. पण बाजी अर्थातच ओम शांती ओमने मारली.

3. 'फॅशन' वि. 'गोलमाल रिटर्न्स'

2008 मध्ये पहिल्यांदा असं झालं की दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट चांगले चालले. अजय देवगण आणि गोलमाल गँगचा हा दुसरा चित्रपट होता. तर त्यांच्यासमोर होत्या प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत. फॅशनला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. तर दुसरीकडे गोलमालच्या अक्ख्या सिरीज मधला सर्वात कमी चाललेला चित्रपट असला तरीही गोलमाल रिटर्न्स हिट नक्कीच झाला होता. (हेही वाचा. Housefull 4 Trailer: 200 वर्षांपूर्वीचा काळ विनोदी रुपात मांडून हसून लोट पोट करणारा हाऊसफुल 4 चा ट्रेलर प्रदर्शित)

4. 'जब तक है जान' वि. 'सन ऑफ सरदार'

2012 सालची ही चुरस बॉक्स ऑफिस पेक्षा बाहेरच जास्त रंगली. यश चोप्रांचा हा अखेरचा चित्रपट. एकीकडे प्रदर्शनाच्या काहीच दिवस आधी झालेल्या मृत्यूमुळे अजय देवगण आपला चित्रपट पुढे ढकलेल असे वाटत असतानाच त्याने यश राज फिल्म्सच्या विरोधात चित्रपटगृहांच्या स्क्रीन्स मिळवताना आपल्या मक्तेदारीचा वापर करत असल्याचं जाहीर करून तक्रार नोंदवली. वाद मिटायला काही वर्ष जावी लागली. पण बॉक्स ऑफिस वर दोन्ही चित्रपट चालले.

5. 'ए दिल है मुश्किल' वि. 'शिवाय'

2016 ला मात्र गोष्टी अजून चिघळल्या. त्या वर्षी अजय देवगणने कारण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स वर स्क्रीन्स लाटल्याचा तसेच आपल्या चित्रपटाविरोधात प्रसिद्धी करण्यासाठी काही जणांना पैसे दिल्याचा आरोप केला. बराच काळ अजय देवगण-काजोल आणि कारण जोहर मधले संबंध दूषित राहिले. कालांतराने त्यांच्यात समेट घडून आली. बॉक्स ऑफिस वरची लढतही चुरशीची राहिली. दोन्ही चित्रपट हिट झाले.