Kangana Ranaut, Jaya Bachchan (PC -facebook and ANI)

Kangana Ranaut On Jaya Bachchan: भाजप खासदार रवी किशन (BJP MP Ravi Kishan) यांनी सोमवारी लोकसभेत चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी राज्यसभेच्या शून्य प्रहरात रवी किशन यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. त्यानंतर आता कंगना रनौतने (Kangana Ranaut) जया बच्चन यांना आपल्या ट्विटर हँडलवरून सवाल केला आहे.

जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता किंवा मुलगा अभिषेक असता तर तुमची भूमिका समान राहिली असती का? असा सवाल कंगनाने जया बच्चन यांना विचारला आहे. कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जयाजी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेतासोबत किशोरवयात मारहाण, ड्रग्ज देणे आणि विनयभंग झाला असता तर तुम्हीही असेच म्हणाला असतात का? अभिषेकने सतत गुंडगिरी आणि छळवणूक झाल्याबद्दल तक्रार केली असती, आणि एक दिवस तो लटकलेल्या अवस्थेत आढळला असता, तर आपण असेच बोलला असता काय?' असा प्रश्न कंगनाने जया बच्चन यांना केला आहे. (हेही वाचा - Bollywood Drugs Controversy: रवि किशन यांनी लोकसभेत उठवलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्द्यावर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं)

दरम्यान, रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात भाष्य केलं होतं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली होती. सरकारने ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी. भारतीय सिनेसृष्टीत ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबी चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडत आहे, असं म्हटलं होतं.

यावर जया बच्चन यांनी रवी किशन यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्षरित्या बोलताना म्हटलं की, सरकारने मनोरंजन विश्वाच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. कारण मनोरंजन विश्वच नेहमी सरकारच्या मदतीला येते. एखादी राष्ट्रीय आपत्ती आल्यास ते पुढे येतात, पैसे देतात, सेवा बजावतात. काही जणांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे. यानंतर कंगनाने जया बच्चन यांच्यावर आपल्या ट्विटरवरून निशाणा साधला आहे.