दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker),आपल्या आगामी ‘पानिपत’ (Panipat) या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडत आहेत. मात्र प्रदर्शनाआधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी या चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीतून चोरली गेली असल्याचा आरोप केला. याबाबत त्यांनी कोर्टातही धाव घेऊन याचिका दाखल केली होती. आपल्याला दाखवल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र आता कोर्टाने पाटील यांना दिलासा न देता पानिपतच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे.
मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार दिला. ऐतिहासिक घटनांवरील कॉपीराइटच्या अधिकारावर कोणीही दावा करू शकत नाही, असे हायकोर्टाचे मत आहे. अशाप्रकारे माजी आयएएस अधिकारी आणि प्रख्यात मराठी लेखक विश्वास पाटील यांनी, चित्रपटासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा फेटाळून लावला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही अंतरिम सवलत दिली नाही. या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांच्यासमोर झाली. विश्वास पाटील यांच्या वकिलाने, चित्रपटाची कथा आणि संवाद हे पूर्णतः पानिपत या कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगितले. तसेच याबाबत पाटील यांची परवानगी घेतली नसल्याचेही नमूद केले आहे. (हेही वाचा: पानिपत चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; विश्वास पाटील यांचा आपली कथा चोरल्याचा आरोप, ठोकला 7 कोटींचा दावा)
याबाबत न्यायमूर्ती म्हणाले की, 'ऐतिहासिक घटना आणि संदर्भांच्या बाबतीत कोणालाही कॉपीराइटचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. चित्रपटाचे प्रदर्शन 6 डिसेंबर रोजी प्रस्तावित आहे, त्यामुळे याक्षणी आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालू शकत नाही. या चित्रपटात मराठा योध्यांचे संदर्भ दाखवण्यात आले आहेत, जे एक कल्पना म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळे हे कॉपीराइटचे उल्लंघन होऊ शकत नाही.' न्यायाधीशांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ आठवड्यांनंतर ठेवली असून, या चित्रपटाच्या निर्मात्यास पाटील यांच्या दाव्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले.