दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker),आपल्या आगामी ‘पानिपत’ (Panipat) या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत. मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवीन वाद उफाळून आला आहे. प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी या चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीतून चोरली गेली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनीं कोर्टात धाव घेऊन, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत पाटील यांनी तब्बल सात कोटींचा दावा ठोकला आहे.
विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्यावर केस दाखल केली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माते रोहित शेलाटकर यांचे प्रतिनिधी संजय पाटील यांनी विश्वास पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कादंबरीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली होती. लेखक म्हणून विश्वास पाटील यांचे नावदेखील देण्यात येईल, तसेच हा चित्रपट कादंबरीवर आधारित असल्याचे लिहिले जाईल असे ठरले होते. मात्र पाटील यांनी ट्रेलर पाहिल्यावर त्यात तसे काहीच नसल्याचे आढळले. उलट चित्रपटातील सर्व संवाद हे पूर्णतः पानिपत कादंबरीवर आधारीत असल्याचे आढळले. (हेही वाचा: Panipat Trailer: मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई मोठ्या पडद्यावर; ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज (Video
त्यानंतर आता विश्वास पाटील यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, 7 कोटीचा दावा ठोकला आहे. विश्वास पाटील यांच्या परवानगीशिवाय त्यांची ‘पानिपत’ ही लोकप्रिय कादंबरी आणि ‘रणांगण’ या नाटकातील प्रसंग, कथा आणि बरासचा भाग चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी 23 नोव्हेंबरला न्यायालयात धाव घेतली आहे. निर्मात्यांकडून या चित्रपटाची संहिता ते मागवून घेणार आहे, ती वाचून पुढील निर्णय घेतला जाईल.