जेष्ठ संगीतकार 'खय्याम' यांचे दीर्घ आजाराने निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा; पीएम नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख
Veteran music composer Khayyam passes away. (Photo Credits: Yogen Shah)

खय्याम (Khayyam), एक दिग्गज जेष्ठ संगीतकार (Veteran music composer) आणि 'कभी कभी' (Kabhi Kabhie), 'उमराव जान' (Umrao Jaan) यांसारख्या चित्रपटांच्या संगीतासाठी प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. मोहम्मद जहूर खय्याम हाशमी, जे हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये खय्याम या नावाने प्रसिद्ध होते. खय्याम हे गेले काही दिवस लंग इन्फेक्शनमुळे (Lung Infection) मुंबईच्या सुजय हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये भरती होते. सोमवारी (19 ऑगस्ट) रात्री वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गंभीर आजाराने आजारी असल्याने खय्याम यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या वृत्तामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील खय्याम यांच्या जाण्याने आपले दुःख व्यक्त केले आहे.

पीएम नरेंद्र मोदी ट्विट - 

संगीतकार म्हणून खय्याम यांच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्रिशूल, नूरी, शोला और शबनम सारख्या चित्रपटांचा समावेश होतो. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारदेखील प्राप्त आहे. या व्यतिरिक्त त्यांना तीनवेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपल्या कारकीर्दीमध्ये खय्याम यांनी जवळजवळ 71 चित्रपट व नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिले होते. त्यांनी एकूण 642 गीतांचे संगीत दिग्दर्शन केले होते, ज्यामध्ये 220 गैर फिल्मी गाण्यांचा समावेश आहे. खय्याम यांची पत्नी जगजीत कौर यादेखील गायिका आहेत.

लता मंगेशकर ट्विट -

18 फेब्रुवारी 1927 रोजी अविभाजित भारत, पंजाबमधील नवांशहर (आताचे पाकिस्तान) येथे जन्मलेले, खय्याम लहानपणापासूनच संगीतप्रेमी होते.फाळणीनंतर जेव्हा त्याचे कुटुंब दिल्लीला आले तेव्हा त्यांनी तेथे संगीताचे सुफियाना प्रशिक्षण घेणे सुरू केले. अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या आईने त्यांची शिफारस केली व त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट फुटपाथ 1953 साली प्रदर्शित झाला. आज जरी खय्याम साहेब आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपाने ते सदैव अमर राहतील. खय्याम यांचे पार्थिव काल रात्रीच घरी नेण्यात आले व आज त्यांच्यावर चार बंगला येथील कब्रस्तानात दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती गझल गायक तलत अझिज यांनी दिली.