Rajinikanth Craze: रजनीकांत यांचा 'Darbar' चित्रपट पाहण्यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भर पगारी रजा, फ्री मूव्ही तिकिट्स
Darbar First Look Poster (Photo Credits-Twitter)

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा नवा चित्रपट दरबार (Darbar) लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही रजनीकांत यांचे चाहते या नव्या चित्रपटासाठी खास तयारी करत आहेत. रजनीकांत या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्‍याच वर्षांनंतर ते पोलिसाची भूमिका सकारात आहेत.

रजनीकांतच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बराच उत्साह आहे. त्यात एका कंपनीने हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांना भर पगारी रजा (Paid Leaves) आणि विनामूल्य तिकिटे (Free Tickets) देऊ केली आहेत. जेणेकरून हे लोक त्यांच्या आवडत्या स्टारच्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

खास गोष्ट म्हणजे रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट रिलीज होताना ही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी ही ऑफर देते. सध्या सोशल मिडियावर या ऑफिसकडून दिलेल्या पत्राची प्रत व्हायरल होत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगादास करीत असून या कॉप ड्रामामध्ये सुनील शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकेच नाही तर मदुराई येथे रजनीकांतच्या चाहत्यांनी त्याच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी मंदिरात खास प्रार्थना देखील केली. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून चाहत्यांनी 15 दिवसांचा उपवास केला आहे, जमिनीवर अन्न खाल्ले आहे. दक्षिणेकडे अशी ही रजनीकांतची क्रेझ पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा: हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार, जाणून घ्या रजनीकांत विषयी 'या' थक्क करणाऱ्या गोष्टी)

काही काळापूर्वी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी खास तंत्र वापरले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका खास विमानाची व्यवस्था करण्यात आली होती आणि या फ्लाइटवर रजनीकांत यांचे मोठे चित्र पाहायला मिळाले. या फ्लाइटचे नाव दरबार फ्लाइट ठेवले असून, अनेक चाहत्यांनी या विमानाविषयी ट्विट केले होते. विशेष म्हणजे या चित्रपटात रजनीकांत 27 वर्षानंतर पोलिस म्हणून दिसणार आहेत. हा चित्रपट 9 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग मुंबईत झाले असून उर्वरित चित्रीकरण चेन्नई येथे झाले आहे.