पुणे: आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चा शो रद्द; संतप्त प्रेक्षकांकडून शिवीगाळ
ठग्ज ऑफ हिंदोस्तान पोस्टर (Photo Credits: Twitter)

अभिनेता आमिर खान याचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी आमिरच्या चाहत्यांनी साहजिकच चित्रपटगृहांवर गर्दी केली. मात्र, पुण्यातील औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्सने या चित्रपटाचा शो अचानक रद्द केला. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहावर पोहोचलेल्या प्रेक्षकांची चांगलीच नाराजी झाली. काही वेळ वाट पाहिल्यानंतरही शो सुरु झाला नाही. अखेर, हा शोच रद्द करण्या आल्याचे चित्रपटगृह प्रशासनाने सांगितले. त्यामुळे चिडलेल्या प्रेक्षकांच्या संतापाचा सामना व्यवस्थापनाला करावा लागला. आमिरचे चाहते आणि प्रेक्षकांनी चित्रपटगृह परिसरात जोरदार गोंधळ घातला. या वेळी शांततेचे आवाहन करणाऱ्या चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांना संतप्त प्रेक्षकांनी शिवागाळ केल्याचा प्रकारही घडला.

प्राप्त माहितीनुसार,'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चा शो औंध येथील वेस्टएंड या मॉलमध्ये असलेल्या सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये दाखवला जाणार होता. या शोची वेळ सकाळी 9.15 ची होती. मात्र, वेळेत शो सुरु होण्याऐवजी 10 वाजून गेले तरीही शो सुरुच होत नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांनी व्यवस्थापणाकडे विचारणा केली. मात्र, व्यवस्थापणाकडून काहीही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे शो सुरु करावा म्हणून प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ हळूहळू वाढत गेला. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे या गर्दीला हाताळणे सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कठीण होऊन बसले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव सुरु होता. (हेही वचा,Thugs of Hindostan चे हटके प्रमोशन ; Google Map वर आमिर खान होणार वाटाड्या)

शो सुरु करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे काही काळ विलंबाने शो सुरु होईल. असे सांगत चित्रपट व्यवस्थापनाने प्रेक्षकांकडून वेळ मागून घेतली होती. पण, थोड्या थोड्या वेळाच्या फरकाने तीन वेळा वेळ वाढवून घेऊनही व्यवस्थापनाने शो सुरु केलाच नाही. अखेर, हा शो रद्द करण्या आला असल्याचे चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी प्रेक्षकांना सांगितले. त्यामुळे प्रेक्षक चिडले. त्यांनी चित्रपटगृहासमोर गोंधळ घातला आणि कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली.