The Kerala Story Contoversy: 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या टीजरमुळे नव्या वादाला सुरुवात; डीजीपींनी दिले FIR नोंदवण्याचे निर्देश, जाणून घ्या सविस्तर
The Kerala Story (संग्रहित संपादित प्रतिमा)

अदा शर्माचा आगामी चित्रपट 'द केरळ स्टोरी'शी (The Kerala Story) संबंधित वाद वाढत असलेला दिसत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता केरळच्या डीजीपींनी तिरुवनंतपुरमच्या पोलीस आयुक्तांना चित्रपटाबाबत एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पाठवलेल्या तक्रारीच्या आधारे हे आदेश देण्यात आले आहेत. उच्च तपास गुन्हे अन्वेषण कक्षाने चित्रपटाबाबत प्राथमिक चौकशी केली, ज्याचा अहवाल डीजीपीला पाठवण्यात आला. या अहवालाच्या आधारे डीजीपींनी एफआयआर दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी मंगळवारी (7 ऑक्टोबर 2022) तिरुवनंतपुरमचे पोलीस आयुक्त स्पर्जन कुमार यांना 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या क्रू सदस्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. द केरळ स्टोरीचा टीझर गुरुवारी (3 नोव्हेंबर 2022) यूट्यूबवर रिलीज झाला. टीझरमध्ये नर्स बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे, जिचे घरातून अपहरण करून ISIS चा दहशतवादी बनवण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. टीझरमध्ये बुरखा परिधान करून ती, आपल्यासारख्या आणखी 32000 मुलींचे धर्मांतर करून त्यांना सीरिया आणि येमेनमध्ये पुरण्यात आले असण्याबाबत भाष्य करताना दिसत आहे.

त्यांनतर आता काँग्रेसने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केरळ विधानसभेतील काँग्रेसचे नेते व्हीडी सठेशन म्हणाले की, ‘चित्रपट चुकीची माहिती पसरवत आहे आणि त्यावर बंदी घातली पाहिजे. मी टीझर पाहिला आहे. टीजरमध्ये दाखवल्याप्रमाणे केरळमध्ये असे काही घडत नाही. इतर राज्यांसमोर केरळची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार आहे. या चित्रपट द्वेष पसरवत आहे, त्यामुळे त्यावर बंदी घातली पाहिजे. सर्वसाधारणपणे, आम्ही चित्रपटांवर बंदी घालण्याच्या विरोधात आहोत, परंतु अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे जातीय समस्या निर्माण होतील.’ (हेही वाचा: 'हर हर महादेव' चित्रपटाच्या प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी होणार कारवाई; उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा इशारा)

सीपीआय(एम) राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून 'द केरळ स्टोरी'च्या टीझरवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ज्याप्रकारे विरोध झाला होता, तसाच विरोध ‘द केरळ स्टोरी’बाबत पाहायला मिळत आहे. विवेक अग्निहोत्रीने आपल्या चित्रपटात काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराचे चित्रण केले आहे, तर विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी; चित्रपटात इस्लामिक धर्मांतर आणि तस्करीला बळी पडलेल्या केरळमधील महिलांचे दुःख दाखवले आहे.