
'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काश्मीर प्रश्नाचे सत्य बाहेर आणण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी केली पाहिजे, असे म्हटले आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या केलेल्या कौतुकाला उत्तर देताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, सरकारला सत्य बाहेर आणायचे असेल तर त्यांनी या संपूर्ण घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, प्रत्येक चित्रपटाची स्वतःची कथा असते आणि प्रत्येक चित्रपट सत्य असेलच असे नाही, त्यामुळे सत्य बाहेर आणण्यासाठी तपास करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये जे काही झाले, ते कसे झाले? असे का झाले? हे कोणी केले ? त्याची चौकशी झाली पाहिजे. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांची फाईल उघडण्याची मागणीही त्यांनी केली. काश्मीर फाइल्स' ही कथा 1990 मध्ये काश्मिरी पंडित समुदायाच्या नरसंहारात बळी पडलेल्या पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे. (हेही वाचा: The Kashmir File: कपिल शर्माने 'द काश्मीर फाइल्स'चे प्रमोशन करण्यास नकार दिला? अनुपम खेर यांनी 'या' वादावर दिली प्रतिक्रिया)
फारुख अब्दुल्ला यांनी टाइम्स नाऊशी बोलून या विषयावर त्यांचे विचार मांडले. काश्मिरी हिंदू हत्याकांडावर 32 वर्षांच्या मौनानंतर फारुख अब्दुल्ला यांनी आता चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, 'या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. त्यावेळी राजीव गांधी बरेच काही करू शकले असते.’
दरम्यान, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, असे चांगले चित्रपट बनले पाहिजेत, असे चित्रपट सत्य समोर आणतात. याआधी चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती.