The Asli Dilwale! मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या हस्ते दिग्दर्शक Rohit Shetty चा सत्कार; COVID-19 Frontline Workers साठी केलेल्या मदतीबाबत मानले आभार
Mumbai Police Honours Rohit Shetty (Photo Credits: Twitter)

मार्चपासून संपूर्ण देशावर कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाचे सावट आहे. या दरम्यान लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने देशातील जवळजवळ संपूर्ण गोष्टी बंद होत्या. आर्थिक क्रियाकलाप थांबल्याने सरकारवरचा बोझाही वाढला होता. याचवेळी अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या. बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान यांनी आपापल्या परीने हातभार लावला होता. यामध्ये अजून एका नावाची भर पडली होती ती म्हणजे दिग्दर्शक, निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) याची. रोहित शेट्टीने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून आज मुंबई पोलिसांकडून त्याचा सत्कार करण्यात आला.

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘अस्सल 'दिलवाले'! दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी कोविडच्या संकट काळात कर्तव्यावरील पोलीस जवानांसाठी राहण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या उपचारांचा खर्च उचलणे अशा माध्यमांतून मुंबई पोलिसांना मदत केली. या प्रशंसनीय कार्याबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त श्री परम बीर सिंह यांनी त्यांचे आभार मानले.’

याआधी 11 जुलै रोजी देखील मुंबई पोलिसांनी रोहित शेट्टीचे आभार मानले होते. रोहित शेट्टीने पोलिसांसाठी 11 हॉटेल दिले होते ज्याचा उपयोग कोरोना वॉरियर्ससाठी केला जात होता. यासह फिल्ममेकर रोहित शेट्टीने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजला 51 लाख रुपयांची देणगी दिली होती. (हेही वाचा: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे)

दरम्यान, कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील लोकांच्या मदतीला धावून आला होता. लोकांना त्यांच्या घरी पोहोचवणे असो वा त्यांना नोकऱ्या मिळवून देणे असो, इतकेच काय तर या कोरोनाच्या काळात सोनूने लोकांना घरे मिळवून देण्यासही मदत केली होती. आता गरजू लोकांना मदत करण्यासाठी सोनूने आपल्या आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याद्वारे त्याने 10 कोटींचे कर्ज घेतले आहे.